कल्याण – पहलगाम येथील बेसरन पठारावरील दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या डोंबिवलीतील भागशाळा मैदान भागातील हेमंत जोशी यांच्या नावाची शवपेटी अंत्यविधी झाल्यानंतर स्थानिक कार्यकर्ते, प्रशासनाने विल्हेवाट लावणे गरजेची होती. याऊलट ही शवपेटी हेमंत जोशी यांच्या नावासह शिवमंदिर स्मशानभूमीच्या प्रवेशव्दारावर दोन दिवसांपासून अडगळीत पडली आहे. हे क्लेशदायक आहे, अशी प्रतिक्रिया उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी समाज माध्यमांतून (एक्स) दिली आहे.
दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांना दहशतवाद्यांनी निर्घृणपणे मारले. या तिन्ही कुटुंबीयांप्रती आपल्या दुखद भावना व्यक्त करण्यासाठी डोंबिवलीकर मोठ्या संख्येने या तिन्ही मृत पर्यटकांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशीच्या डोंबिवलीमध्ये सर्व व्यापारी संघटना, विक्रेते, खासगी आस्थापना यांनी सहभाग घेऊन दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीत कडकडीत बंद पाळला.
अशा दुखद प्रसंगी तिन्ही मृत पर्यटकांना स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी नेण्यात आल्यानंतर दहन प्रक्रिया पार पाडल्यानंतर हे तिन्ही मृतदेह ठेवलेल्या शवपेट्यांची योग्यरितीने विल्हेवाट लावणे हे स्मशानभूमी प्रशासनाचे काम आहे. हे कर्तव्य पार न पाडता प्रशासनाने हेमंत जोशी यांची नाव असलेली शवपेटी शिवमंदिर स्मशानभूमीच्या प्रवेशव्दारावरील कोपऱ्यात अडगळीत ठेवली आहे. हा त्या शेवपेटीत ठेवलेल्या मृत आत्म्याचा अवमान आहे, अशी प्रतिक्रिया स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
भागशाळा मैदानातील अंत्ययात्रेची तयारी ते दहनापर्यंत विविध सामाजिक, राजकीय कार्यकर्ते तळमळीने काम करत होते. त्यांचेही या महत्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यावर त्यांनी टीवटरवरून (एक्स) मुख्यमंत्री कार्यालय ते सर्व प्रशासन प्रमुखांना यासंदर्भात कळविले आहे.
बाल कामगारांचा वापर
डोंबिवलीतील शिवमंदिर येथील स्मशानभूमीत चित्ता रचण्यासाठी लागणारी लाकडे उचलण्यासाठी अल्पवयीन शाळकरी मुले वापरली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. कुठल्याही कामाच्या ठिकाणी बाल मजुुर, कामगारांचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही शिवमंदिर येथील स्मशानभूमीत स्मशानभूमी चालकाकडून चित्ता रचण्यासाठी लाकडे उचलण्यासाठी अल्पवयीन मुले वापरली जात असल्याचे उघडकीला आले आहे. आता शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. कमीत कमी मजुरीत गरजु मुले अशा कामांसाठी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे गरजु मुलांना अशा अवजड कामासाठी वापरले जात असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. आमदार राजेश मोरे यांचा हा प्रभाग आहे. त्यामुळे याप्रकरणात त्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.