डोंबिवली : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली पश्चिमेतील तीन वेगळ्या भागातील नागरिकांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच हे नागरिक राहत असलेल्या सोसायटी परिसरात डोंबिवलीकर नागरिकांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गर्दी केली होती.
दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेले संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने यांच्या राहत्या घरांच्या परिसरात, सोसायटी आवारात सकाळपासून महिला, पुरूष शोक व्यक्त करण्यासाठी जमा झाले होते. या तिन्ही मयत नागरिकांचे कुटुंब काश्मीर येथे असल्याने त्यांच्या डोंबिवलीतील नातेवाईक कुटुंबीयांच्या भेटी घेऊन नागरिक शोक व्यक्त करत होते. या तिन्ही मृत पर्यटकांचे नातेवाईक, मित्र, आप्त रात्रीपासून सोसायटीत ते राहत असलेल्या घरी हजर झाले होते.
परिसरातील नागरिक या इमारत परिसरात जमवून घडल्या घटनेचा निषेध व्यक्त करत होते. यामध्ये महिला, पुरुष, तरूण, तरुणी, ज्येष्ठ, वृध्द यांचाही सहभाग होता. या तिन्ही कुटुंबीयांचे नातेवाईक बुधवारी सकाळीच काश्मीर येथे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेले आहेत. ते परतल्यानंतरची अंत्यविधीची तयारी उपस्थित नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. हे रहिवासी राहत असलेल्या परिसरात पालिका सफाई कामगारांनी साफ सफाई केली आहे. मृत पर्यटकांच्या घराच्या परिसरात त्यांचे मृतदेह आणल्यानंतर वाहतूक कोंडी होऊ नये. या तिन्ही मृतांच्या अंत्ययात्रा स्मशानभूमीपर्यंत विना वाहतूक अडथळा जातील यासाठी डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक यांना योग्य ठिकाणी नियुक्त्या दिल्या आहेत.
स्थानिक पोलीस, महसूल अधिकारी, स्थानिक पालिका अधिकारी, स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण, खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांचे कार्यकर्ते, आमदार राजेश मोरे पहलगाम ते डोंबिवली दरम्यानच्या प्रवासात तिन्ही पर्यटकांचे मृतदेह सुरळीत येतील, त्यांच्या अंत्ययात्रा याविषयी देखरेख ठेऊन आहेत. याशिवाय मृत कुटुंबीयांचे नातेवाईक यांना आवश्यक ते सहकार्य देण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन डोंबिवलीकरांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू आपल्या कुटुंबातील एका सदस्याचा मृत्यू झाला आहे, या भावनेतून डोंबिवलीकर वावरत असल्याने डोंबिवली शहर आज शोकाकुल आहे. उत्सवी कार्यक्रमांना अनेक आयोजकांनी आवर घातला आहे.
निष्पाप नागरिकांचे या हल्ल्यात बळी गेले. पर्यटनासाठी कोणी कुठे जाऊ नये का. देशात कोणाला दहशतवादामुळे मुक्तपणे फिरता येत नसेल तर ती जबाबदारी कोणाची. या सगळ्या घृणास्पद विषयाला जबाबदार कोण याचा विचार आता सरकारांनी करावा. आतापर्यंत दहशतवादी सुरक्षा दले लक्ष्य करत होती. ती वेळ आता पर्यटक नागरिकांवर येत असेल तर विषय अतिशय गडद होत आहे. – दीपेश म्हात्रे, ठाकरे गट जिल्हाप्रमुख,शिवसेना, डोंबिवली.