डोंबिवली – पेहलगाम बेसरन टेकड्यांवर सौंदयसृष्टीचा आनंद घेत होतो. पर्यटकांची खूप गर्दी होती. काही भागात काही खेळ सुरू आहेत म्हणून तेथे गर्दी जमली आहे असे वाटले. काही पर्यटक घाईघाईने बेसरन टेकड्या उतरून पेहलगामच्या दिशेने निघाले होते. आम्ही या हालचाली गांभीर्याने घेतल्या नाहीत. काही क्षणात लष्करी वेशातील दोन दहशतवादी आमच्या समोर उभे राहिले. आणि त्यानंतरच्या हदयद्रावक प्रसंग सांगताना अतुल मोने यांच्या पत्नी अनुष्का यांच्या मनाचा बांध फुटला.
हृद्रयद्रावक अनुभव सांगताना सोबत बारावीत शिक्षण घेत असलेली कन्या ऋचा मोने, अनुष्का यांचा भाऊ प्रसाद सोमण होते. डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडीतील श्रीराम अचल सोसायटीत मोने कुटुंब राहते.
पर्यटनासाठी आम्ही जम्मु काश्मीरला गेलो होतो. पेहलगाम येथील बेसरन टेकड्यांवर पर्यटनाचा आनंद घेत असताना मंगळवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास पर्यटनाच्या ठिकाणी धावपळ होत असल्याचे दिसले. काही पर्यटक बेसरन टेकड्यांवरून पेहलगामच्या दिशेने घाईत निघाले होते. एके ठिकाणी गर्दी जमली होती. तेथे काही खेळ चालू असतील असे वाटले. काही क्षणात दोन लष्करी वेशातील दहशतवादी (कपाळावर गोप्रन कॅमेरा) आम्ही उभे होतो त्याठिकाणी आले. त्यांनी घोळक्याने सर्व पर्यटकांना एकत्र येण्यास सांगितले. हल्ल्याचा अनुभव असलेल्या स्थानिक घोडे स्वारांना क्षणात दहशतवादी आले आहेत याची जाणीव झाली आणि आता काही तरी भयंकर होईल असे त्यांना वाटले. त्यांनी पर्यटकांना आपण आपले जीव वाचवा असा सल्ला दिला. पर्यटकांना घोडेस्वारांनी दहशतवाद्यांसमोर झुकण्यास सांगितले. यापूर्वीच काही पर्यटक झुकल्या अवस्थेत उभे होते, असे अनुष्का मोने यांनी शोक विव्हल अवस्थेत सांगितले.
दहशतवाद, हल्ला या प्रकाराचा कधी अनुभव नसल्याने पर्यटक हेमंत जोशी पर्यटक का झुकले आहेत. घोडेस्वार आपणास का झुकण्यास सांगतोय या विचाराने अस्वस्थ झाले. हेमंत जोशी यांनी धाडस करून दहशतवाद्यांना आपण काय करताय, असा प्रश्न केला. आम्ही काही करत नाही. तुम्ही बसून राहा, असे बोलून दहशतवाद्यांनी निमिषार्धात हेमंत जोशी यांच्या डोक्यात गोळी झाडली.
संजय लेले कुटुंब, अतुल मोने, हेमंत जोशींचे कुटुंब या प्रकाराने हादरले. किंकाळ्या, आक्रोश, हुंदके सुरू झाले. आम्हाला गोळ्या घालू नका. आम्हाला सोडा, असे आर्जव पर्यटक करत होते. झुकून असलेल्या पर्यटकांना हिंदु कोण आहे. मुसलमान कोण आहे असे प्रश्न दहशतवाद्यांनी केले. हिंदु म्हणून संजय लेले यांनी हात वर करताच त्यांच्या डोक्यात गोळी घालण्यात आली. लेले यांच्यावर गोळी झाडताच ते कोसळले. अतुल मोने यांनीही हिंदु म्हणून हात वर केला तर त्यांच्या पोटात गोळी झाडली. ते जागीच निपचित पडले. हे जीव पिळवटून टाकणारे हद्रयद्रावक प्रसंग सांगताना अनुष्का, ऋचा मोने यांना शोक अनावर झाला होता.
पीडितांना साहाय्य करावे
मृत पर्यटकांच्या घरातील कर्ते पुरूष दहशतवाद्यांनी मारले. प्रत्येक घरात मुले शिक्षण घेत आहेत. काही घरात कमविता कोणी नाही. या गोष्टींचा विचार करून सरकारने मृत पर्यटकांच्या घरात शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या शिक्षणाचा भार उचलावा. त्यांना नोकरीत प्राधान्य मिळेल यासाठी प्रयत्न करावेत.
दहशतवाद्यांना ठेचा
दहशतवाद्यांनी महिला, मुले यांना हात लावला नाही. त्यांनी घरातील कर्त्या पुरुषांना मारले. मोदींचा उल्लेख करत काश्मीरमध्ये आपण आंतक माजविला आहे, असे दहशतवादी पर्यटकांना सुनावत होते. सामान्य पर्यटकांनी कसली दहशत माजवली आहे. कोणाचा राग निष्पाप पर्यटकांवर कशासाठी. पर्यटनासाठी धर्म लागतो का, असे प्रश्न कुटुंंबीयांनी केले. हे क्रूर कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांना सरकारने पकडून त्यांचे डोळे, चामडी काढून जनतेसमोर ठेचले पाहिजे. पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवला पाहिजे, असे अनुष्का यांचे बंधु प्रसाद सोमण यांनी सांगितले.