ठाणे – जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पापांचा बळी गेला, यात काही स्थानिकांचाही सहभाग होता. या हल्ल्यामुळे संपूर्ण जम्मू-काश्मिरमध्ये शांतता पसरली आहे. या आधी असा प्रकार कधीच घडला नव्हता. काश्मिर मध्ये हिंदू- मुस्लिम हे एक आहेत, हिंदू-मुस्लिम मध्ये कधीच भेदभाव झाला नव्हता, असे म्हणत या हल्ल्यामुळे जम्मू काश्मिरच्या प्रतिष्ठेला कालिमा फासल्याची खंत श्रीनगर येथील शबीर खान या हॉटेल व्यावसायिकाने व्यक्त केली.
जम्मू – काश्मिर मधील श्रीनगर, हाऊस बोट, पहलगाम, गुलमर्ग, सोनमर्ग हे पर्यटनासाठी महत्त्वाची ठिकाण आहेत. याठिकाणी नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. याठिकाणी येणारा प्रत्येक पर्यटक आमच्यासाठी पाहुणा असतो. त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची आम्ही खबरदारी घेत असतो. उत्तम प्रकारच्या सोयीसुविधा त्यांना देण्याचा आमचा प्रयत्न असतो. मग, तो पर्यटक हिंदू असो वा मुस्लिम असा कधीच भेदभाव केला जात नाही. प्रत्येक धर्माचा आम्ही लहानपणापासून आदर करत आलो आहोत, असे शबीरने सांगितले.
शबीर पुढे म्हणाला, आमचा गेले १६ वर्षांपासून हॉटेलचा व्यवसाय आहे. त्यामुळे या आधी कधीच इथे असा प्रकार घडला नाही. एखाद दुसरा घडला असेल पण त्याची कारणे वेगवेगळी आहेत. परंतू, ‘आप हिंदू है की मुस्लिम’ असं कधीच कोणाला विचारलं नव्हते आणि असा हल्ला तर, कधीच झाला नाही.
पहलगामच्या घटनेविषयी शबीरचे म्हणणे…
ज्या पहलगामच्या ठिकाणी हा हल्ला झाला ते ठिकाण अति संवेदनशील (रेड झोन) असे आहे. त्यामुळे या ठिकाणी संरक्षणाच्या दृष्टीकोनातून नेहमीच पोलिसांचा तसेच सैन्य दलाचा फौजफाटा असतो. मात्र, ज्या दिवशी हा हल्ला झाला तेव्हा एकही पोलिस किंवा सैनिक याठिकाणी उपस्थित नव्हते. जवळपास ४५ मिनिटे हा हल्ला सुरु होता. पर्यटकांच्या बचावासाठी स्वत: स्थानिक व्यापारी धाऊन आले आणि पर्यटकांचे बचाव कार्य सुरु केले. यात एका स्थानिक व्यावसायिकाचा मृत्यू देखील झाला अशी खंत शबीरने व्यक्त केली.
सर्व काही कधी सुरळित होईल याकडे लक्ष
या हल्ल्यानंतर येथील पर्यटन व्यवसायाला फटका बसला हे निश्चित आहे. परंतू, आम्हाला व्यवसापेक्षा जो प्रकार घडला त्याचे प्रचंड वाईट वाटतं आहे. येथील प्रत्येक घरातील व्यक्ती या प्रकारामुळे रडत आहे. असा प्रकार याठिकाणी घडणे अनअपेक्षित होते. या घटनेमुळे जम्मू – काश्मिर पूर्णपणे बंद आहे. याप्रकारामुळे काश्मिरच्या सौंदर्यावर दाग बसला आहे. हे कधी सुरळित होईल याकडे लक्ष लागले आहे, असे शबीरने सांगितले.