डोंबिवली – पहलगाम बैसरन टेकड्यांच्या मैदानावर (मिनी स्वीत्झर्लंड) समोर दोन जण गोळीबार करत आहेत हे दिसत होते. ते काही अंतरावर होते. आमच्यापर्यंत ते पोहचतील. भयावह असे काही होईल असे वाटलेही नव्हते. अचानक दोन्ही दहशतवादी आमच्या समोर आले. त्यांनी पहिले संजयकाक, त्यानंतर हेमंत काका आणि त्यानंतर माझ्या बाबांना गोळ्या घातल्या. माझी आई आणि माझ्या समोरच बाबांना गोळी घातल्याने आम्ही हादरलो. बाबा जमिनीवर कोसळले. आम्ही त्यांना २० मिनिटे उठविण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांना हालचाल करता येत नव्हती, असा मन हेलावून टाकणारा पहलगाम हल्ल्याचा अनुभव सांगताना अतुल मोने यांची कन्या ऋचा (१६) हिला अश्रू अनावर झाले.
काही कळण्याच्या आत संजयकाका (लेले), हेमंतकाका (जोशी) यांच्यावर दहशतवाद्यांकडून गोळीबार झाल्यानंतर, माझे बाबा (अतुल मोने) दोन्ही दहशतवाद्यांना ‘आम्हाला गोळ्या मारू नका. आम्ही काहीही करत नाही. आम्हाला सोडा’ असे विनंतीवजा आर्जव करत होते. बाबा बोलत असताना आमच्या समोरच बाबांच्या पोटात दहशतवाद्यांनी गोळी झाडली. ते जमिनीवर निपचित पडले. आई आणि मी त्यांना एकमेकींना सावरत आहे त्या परिस्थितीत उठविण्याचा प्रयत्न केला. ते उठू शकत नव्हते. बाबा जमिनीवर निपचित पडले असताना आम्ही २० मिनिटे त्यांना उठवुन सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत होतो. दहशतवादी इतर पर्यटकांवर गोळीबार करत होते. बाबा पडलेत, भीती, आपले काय होणार या तणावपूर्ण वातावरणात असताना पर्यटकांना मारल्यानंतर दोन्ही दहशतवादी तेथून पळून गेले. आम्हाला स्थानिकांनी ‘तुम्ही येथे थांंबू नका. पहलगामच्या दिशेने निघून जा. लष्कराची वाहने आता येतील ते गोळीबारात मरण पावलेले पर्यटक घेऊन जातील’ असे सांगत होते. त्यामुळे स्थानिकांच्या सुचनेप्रमाणे आम्ही बाबांना सोडून तेथून निघालो. तेथून निघताना पाय उचलत नव्हते. कोणत्याही मदतीची शक्यता नव्हती. सगळच अनपेक्षित होत, असे ऋचा हिने सांगितले.
काश्मीर पर्यटनातील पहलगाम बैसरन येथील आमचा पर्यटनाचा पहिलाच दिवस होता. असे काही घडेल असे मनातही नव्हते. काश्मीर सुरक्षित झालय. तेथील पर्यटन वाढले आहे हा विचार करून आम्ही तेथे पर्यटनाला गेलो होतो. फक्त हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना, आमच्या बाबा, काकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. आम्हाला सरकारकडुन न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी ऋचा मोनेने केली. ऋचा बारावीत शिक्षण घेत आहे. तिचे बाबा अतुल मोने मध्य रेल्वेत माटुंगा येथील कार्यशाळेत विभागीय अभियंता होते.