डोंबिवली बाजारात येणारी वैविध्यपूर्ण पुस्तके वाचकांना कळावित. जुन्या, नवीन पुस्तकांचा प्रचार, प्रसार व्हावा या माध्यमातून वाचन संस्कृती वाढीस लागावी, या उद्देशातून येथील उपक्रमशील पै फ्रेन्ड्स लायब्ररीतर्फे रविवारी बुक स्ट्रीटचे डोंबिवलीतील फडके रस्त्यावर आयोजन केले आहे.रविवारी पहाटे पाच ते सकाळी १० वाजेपर्यंत बुक स्ट्रीटवर वाचकांना पुस्तक पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. फडके रस्त्यावरील माॅडर्न कॅफे हाॅटेल ते अप्पा दातार चौक या फूट लांबीच्या रस्त्यावर सुमारे एक लाख पुस्तके मांडण्यात येणार आहेत. पुस्तकांच्या मांडणीमुळे रस्त्याला पुस्तकांच्या नदीचे रुप येणार आहे. बहुभाषिक, कथा, कांदबऱ्या, ऐतिहासिक, विज्ञान, अनुवादित, लहान मुलांसाठीची पुस्तके अशी इंग्रजी, मराठी भाषेतील पुस्तके प्रदर्शनात असतील, असे संयोजक आणि पै फ्रेडन्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै यांनी सांगितले.
विविध वयोगटातील पाच हजाराहून अधिक वाचनप्रेमी नागरिक या उपक्रमात सहभागी होतील, या विचारातून हे नियोजन करण्यात आले आहे. विदेशात अशाप्रकारचे बुक स्ट्रीट प्रसिध्द आहेत. देशोदेशीचे दर्दी वाचक या बुक स्ट्रीटवर येत असतात. मुंबईत चर्चगेट स्थानकाच्या बाहेर, फोर्ट परिसरातील पदपथांवर पुस्तकांची प्रदर्शने पाहण्यास मिळायची. एक दिवस रस्त्यावर गोंगाट नाही, बाजार नाही. तो दिवस फक्त पुस्तकांसाठी. या विचारातून विदेशात एक दिवस रस्त्यावर पुस्तकेच पुस्तके मांडली जातात. लोकांची ती पुस्तके पाहणे, खरेदीसाठी झुंबड उडते. तोच प्रकार डोंबिवलीत राबवून पहावा म्हणून हा उपक्रम आयोजित केला आहे, असे संयोजक पुंडलिक पै यांनी सांगितले.
हेही वाचा >>> ट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडी; ठाणे ते ऐरोलीपर्यंत वाहनांच्या रांगा
शनिवारी रात्री १० ते रविवारी पहाटे साडे चार वाजेपर्यंत फडके रस्त्यावरील माॅर्डर्न कॅफे हाॅटेल ते अप्पा दातार चौकापर्यंतच्या रस्त्यावर सतरंज्या टाकून पुस्तके मांडण्यात येणार आहेत. पुस्तक मांडणी आणि नियोजनासाठी डोंबिवलीतील विविध संघटनांचे २०० स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. डोंबिवली, ठाणे, कल्याण परिसरातील वाचनप्रेमी नागरिक या उपक्रमात सहभागी होतील, असा विश्वास पै यांनी व्यक्त केला.
वाहतूक बदल
बुक स्ट्रीटमध्ये सहभागी होणाऱ्या वाचकाने पुस्तक पाहणी केल्यानंतर त्याला पै फ्रेडन्स लायब्ररीतर्फे एक पुस्तक मोफत भेट देण्यात येणार आहे. रविवारी पहाटे पाच वाजल्या पासून ते सकाळी १० वाजेपर्यंत माॅर्डन कॅफे ते अप्पा दातार चौकात होणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. या उपक्रमाला वाहतूक पोलीस, पोलिसांनी सहकार्य केले आहे.