पेंटेड लेडी हे जगामधील सर्वात जास्त ठिकाणी मिळणारे फुलपाखरू आहे. ऑस्ट्रेलिया आणि अंटाक्र्टिका खंड सोडता जगातल्या उर्वरित सर्व ठिकाणी हे फुलपाखरू सहज आढळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निम्फैलिडे म्हणजेच ब्रश फुटेड कुळातील हे आणखी एक फुलपाखरू आहे. याच्या जगभरातील संचाराचे प्रमुख कारण म्हणजे यांचं खाद्य झाड. थिसल या प्रकारच्या रानटी झाडांवर ही फुलपाखरे आपला सुरवंट व्यवस्थेतील काळ व्यतीत करतात आणि याच झाडाची पाने खातात. अशा प्रकारची रानझुडपे जगभर सापडतात आणि म्हणून त्यांच्यावर वाढणारे पेंटेड लेडी फुलपाखरुसुद्धा जगभर सापडते.

पेंटेड लेडी हे मोठय़ा आकाराचे म्हणजे जवळपास ९ सेंटीमीटर आकाराचे फुलपाखरू आहे. या फुलपाखराचे पंख हे गडद नारिंगी रंगाचे असतात आणि त्यावर काळे ठिपके असतात. या फुलपाखरांच्या पुढच्या पंखांच्या टोकावर आधी एक मोठा पांढरा ठिपका आणि त्यानंतर चार पांढऱ्या ठिपक्यांची माळ असते. मागच्या पंखांवर अगदी मागे पाच काळे ठिपके असतात. शिवाय दोन्ही पंखांची कडा ही पांढऱ्या तुटक ठिपक्यांनी रेखलेली असते. त्याच्या मधेमधे आणि आतल्या बाजूला काळ्या ठिपक्यांची नक्षीही असते.

पेंटेड लेडी फुलपाखरांचे नर आपली हद्द स्वत:च आखून घेतात आणि त्याची राखणही करतात. मादी पेंटेड लेडी गोरखमुंडी आणि याच प्रकारातील रानझुडपांवर अंडी घालते. जाडसर पानांचे हे झुडूप पाणथळ ठिकाणी हमखास आढळते. अंडय़ामधून बाहेर येणारे सुरवंट ही पाने खातात. शिवाय या पानांमध्ये स्वत:साठी रेशमी धाग्यांचे लेपनही बनवतात. या लेपनामध्ये बसून स्वत:चा बचाव करतात. सुरवंटापासून फुलपाखरू व्हायला थंड प्रदेशात जवळपास दोन महिने लागतात, तर उबदार वातावरणात हीच वाढ दीड महिन्यात पूर्ण होते. पूर्ण वाढ झालेल्या फुलपाखराचे आयुष्य हे महिनाभराचेच असते. पेंटेड लेडी ही फुलपाखरे थंडी संपताना उत्तर अफ्रिकेतून युरोप खंडात स्थलांतर करतात. हे स्थलांतर हजारो मैलांचे असल्यामुळे स्थलांतर सुरू करणारी पिढी स्थलांतर पूर्ण होईपर्यंत जिवंत नसते. स्थलांतर पुढे सुरू ठेवण्याचे काम पुढील पिढय़ा करतात. यांचे उडणेही अगदी वेगवान असते. स्थलांतर करताना ही फुलपाखरे जमिनीपासून खूप उंच उडत नाहीत. स्थलांतर होताना मोठय़ा संख्येच्या थव्याने होते.

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Painted lady butterfly