वासुदेव कामत सुप्रसिद्ध चित्रकार
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील काशीमिरा भागात वास्तव्याला असणारे वासुदेव कामत हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवलेले चित्रकार. पुस्तके वाचण्याचा त्यांना व्यासंग तर आहेच, शिवाय माणसांसोबतच्या मैत्रीइतकीच पुस्तकांसोबतची मैत्री त्यांना अधिक महत्त्वाची वाटते.
चित्रकाराला विचारांचे पोषण मिळाल्याशिवाय त्याची कला बहरत नाही आणि त्यासाठी वाचन हे महत्त्वाचे असते. विविध प्रकारच्या साहित्य वाचनातून चित्राची प्रेरणा मिळते आणि ही प्रेरणा स्वयंभू असते म्हणूनच माझ्या चित्रांमध्ये नावीन्य दिसून येते. मुंबईच्या जे.जे.कला महाविद्यालयात शिकत असतानाच अनेकांनी माझ्या मनात वाचनाची आवड रुजवली होती. ‘वीणा’ साप्ताहिकाचे संपादक उमाकांत ठोंबरे यांनी मला कन्नड भाषेतील दिग्गज साहित्यिक शिवराम कारंथ, टी.पी. कैलासन यांचे अनुवादित साहित्य वाचायला दिले होते. जे.जे. महाविद्यालयात सौंदर्यशास्त्र हा विषय शिकवणारे प्राध्यापक संभाजी कदम हे चित्रकला, शिल्प, साहित्य, संगीत, नाटय़ यांच्यात रसास्वादाची एकरूपता कशी आहे, हे अतिशय मार्मिकपणे समजावून सांगायचे. त्यातूनही वाचनाची आवड लागली.
पुढे नोकरी करत असताना लोकलने प्रवास करत असे. त्यावेळी बँकेत नोकरी करणारा सहप्रवासी श्रीधर साठे हा माझा मित्र कवी होता. तो पुण्यातून नियमितपणे प्रसिद्ध होणाऱ्या ‘सोबत’ या नियतकालिकाचे संपादक ग.वा. बेहेरे यांचे ‘कटाक्ष’ हे सदर वाचायला देत असे. अशा विविध व्यक्तींकडून विविध माध्यमातून माझी वाचनाची आवड जोपासत गेली. त्या काळात महेश एलकुंचवार, ह.ना. आपटे, नाथ माधव यांच्या सगळ्या कादंबऱ्या वाचून काढल्या. या लेखकांच्या लिखाणात इतकी ताकद होती की या कादंबऱ्या वाचताना त्यातील प्रसंग, व्यक्तिरेखा अक्षरश: डोळ्यासमोर उभ्या रहायच्या आणि त्यातूनच मला चित्र रेखाटण्यासाठीची प्रेरणा मिळू लागली. मी कधीही कोणत्याही चित्रकाराच्या कलेची नक्कल केली नाही. वाचनातून मिळालेल्या प्रेरणेतूनच माझी चित्रकला कुंचल्याद्वारे कॅनव्हासवर उतरू लागली. हळुहळू कादंबऱ्याऐवजी चरित्रात्मक वाचनाकडे माझा ओढा अधिक वाढला. श्री. ज. जोशी यांचे ‘रघुनाथाची बखर, आनंदी गोपाळ’, बाळ सामंत यांचे इंग्रज अधिकाऱ्यावर लिहिलेले ‘शापित यक्ष’, पु.ल. देशपांडे यांचे ‘व्यक्ती आणि वल्ली’, सुहास बहुलकरांचे चित्रकार गोपाळ देऊसकर यांच्यावर लिहिलेले ‘कलावंत आणि माणूस’ तसेच जे.जे कला महाविद्यालयातून बाहेर पडलेल्या कलावंतावर लिहिलेले ‘बॉम्बे स्कूल’ वाचले. धर्मानंद कोसंबी यांनी बुद्ध साहित्य मराठीत आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. या साहित्याचे भरपूर वाचन केले. या वाचनातले संदर्भ संचित रूपाने मनात घर करून राहिले आहेत आणि हे संदर्भ चित्र रेखाटताना नेहमी उपयोगात येतात.
चित्रांच्या संकल्पनेशी वाचनाची सांगड
दरवर्षी मी एक ठरावीक विषय घेऊन चित्रांचे प्रदर्शन भरवतो. हा विषय रेखाटताना त्याच्याशी संबंधित विविध साहित्याचे वाचन करतो. ते साहित्य लिहिणाऱ्यांशी चर्चा करतो. ‘कृष्ण’ हा विषय निवडल्यानंतर संपूर्ण कृष्ण चरित्राचे पारायण केले. त्यामुळेच कृष्णाची चित्रे साकारताना त्यात वेगळेपणा आणता आला तसेच कृष्ण आणि राधेची एकरूपता वेगळ्याच नजरेतून सादर करता आली. ‘रामायण’ या विषयाचेही तसेच आहे. हा विषय हाती घेण्याआधी तुलसी रामायण, वाल्मिकी रामायण याचे वाचन केलेच, शिवाय गीत रामायणही अनेक वेळा ऐकले. भगवान बुद्धाची चित्रे रेखाटताना ‘द ग्रेट डिसिपल्स ऑफ बुद्धा’ या संकलित स्वरूपाच्या पुस्तकाचा खूप फायदा झाला. ‘मोगरा फुलला’ हा विषय हाताळताना ज्ञानेश्वरांपासून ते आधुनिक संत विनोबा भावे यांच्या रचनांचे अनेकवेळा वाचन केले. प्रत्येक वाचनाच्या वेळी वेगळेच काहीतरी हाती लागते आणि मग ते रंगांच्या माध्यमातून चित्ररूपाने प्रत्यक्षात अवतरते.
पुस्तकातून चित्र पाहाणे उमजते
माझ्या चित्र प्रदर्शनावर अनेकांनी लिखाण केले, वृत्तपत्रातून समीक्षात्मक लिहून आले. परंतु आपण साकारलेल्या चित्रावर आपण स्वत:च लिहिले तर, असा विचार मनात चमकून आला. रेखाटलेल्या चित्राबाबत काय वाटते, त्या चित्राबाबतच्या भावना, आलेला अनुभव, चित्रामागची संकल्पना याबद्दल स्वत: चित्रकाराव्यतिरिक्त सविस्तरपणे आणखी कोण सांगू शकणार असा विचार करून लिहायला सुरुवात केली आणि मी लिहिलेली तीन पुस्तके आणि माझी मुलाखत असलेले चौथे पुस्तक प्रकाशित झाले. ‘रेखांकन ते रेखाचित्र, पोर्ट्रेट्स, माझी पेंटिंग्ज आणि माझे विचार’ या माझ्या पुस्तकातून शिकणाऱ्याला शिकता येते आणि चित्र न समजणाऱ्याला चित्रात काय पाहावे हे कळते.