पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून संतप्त झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पाकिस्तानचा ध्वज जाळला. तसेच भुट्टो यांचा तीव्र निषेध करून पाकिस्तान विरोधात घोषणा दिल्या. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. या वक्तव्याचे तीव्र पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहे. ठाणे शहरातही भाजपने आंदोलन केले. शनिवारी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पाकिस्तानचा ध्वज जाळला. तसेच पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली. स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाकिस्तानने दहशतवाद पोसला आहे. आज जगाकडून पाकिस्तानला विरोध होत आहे. दहशतवादाला समर्थन करणाऱ्या पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना भारताने पाकिस्तानचा युद्धात तीन वेळा केलेल्या पराभवाचा विसर पडला आहे, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात कर्तृत्व सिद्ध केले आहे. जी-२० देशाचे अध्यक्षपद भरताकडे आहे. त्यामुळे केवळ द्वेषापोटी ही विधाने करण्यात आली आहेत, अशी टीका आमदार संजय केळकर यांनी केली.