कल्याण – मागील आठ वर्षापासून रखडलेला कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा काटई उड्डाण पुल ३१ मे रोजी वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या पूल सुरू करण्याच्या आवश्यक प्रक्रिया, कामे पूर्ण करण्यात येत आहेत, अशी माहिती कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी माध्यमांना दिली.

शिळफाटा रस्त्यावरील पलाव चौक, काटई नाका भागातील दररोजच्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण आहेत. या रस्ते मार्गावरील पलावा काटई भागातील पलावा काटई रेल्वे मार्गावरील उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला झाला तर या भागातील वाहन कोंडी कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार आहे. अतिशय संथगतीने चाललेल्या या पुलाच्या कामाची गुरुवारी आमदार राजेश मोरे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली. यावेळी आमदार मोरे यांनी पलावा काटई उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे. या पुलामुळे एक्सपेरिया माॅल, पलावा चौक परिसरात जी वाहन कोंडी होते ती दूर होण्यास मदत होईल, अशी सूचना राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना केली.

यावेळी एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता बारवकर, कार्यकारी अभियंता नितीन बोरुळे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, बंडू पाटील, दत्ता वझे उपस्थित होते. दिवा पनवेल रेल्वे मार्गावरील काटई येथील पलावा काटई उड्डाण पुलाचे काम अंतीम टप्प्यात आहे. या पुलाची बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. येत्या ३१ मे पासून हा पुल वाहतुकीसाठी खुला करणे शक्य होऊ शकते, असे आश्वासन एमएसआरीडीसीच्या अधिकाऱ्यांनी आमदार मोरे यांना दिले.शिळफाटा रस्त्याचे रुंदीकरण आणि सीमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. मानपाडा, काटई ते खिडकाळीपर्यंतच्या रस्ते बाधित शेतकऱ्यांना अद्याप राज्य रस्ते विकास महामंडळाकडून भरपाई देण्यात आली नसल्याने या भागातील रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण रखडले आहे. रुंदीकरण झालेल्या शिळफाटा रस्त्यावरून कल्याण, डोंबिवली दिशेकडून पलावा चौकाकडे वाहन चालक सुसाट वेगाने येतात. काटई पुढील पलावा चौक भागात ही वाहने अडकून पडतात. याठिकाणी पलावा चौकातील पूल, रेल्वे मार्गावरील पूल अद्याप रडतखडत सुरू आहेत.

पलावा चौकातील उड्डाण पूल मागील आठ वर्षापासून या भागातील बाधित दुकानांमुळे रखडला आहे. या परिसराला राजकीय वादाची किनार असल्याने पलावा उड्डाण पूल पूर्ण होण्यात अडथळे येत आहेत. माजी आमदार राजू पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत हा पूल सुरू होण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले. राजकीय वादामुळे या पुलाने गती घेतली नसल्याचे समजते. पलावा चौकातील पूल मार्गी लावण्यासाठी आमदार मोरे यांनी पुढाकार घेण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौक, एक्सपेरिया माॅल कोपरा ही वाहतूक कोंडीची ठिकाणे आहेत. शिळफाटा रस्त्याच्या इतर भागातील कोंडी सुटली असताना हा अडथळयाचा भाग लवकर वाहतुकीसाठी मोकळा व्हावा यासाठी पलावा काटई उड्डाण पूल लवकर वाहतुकीसाठी खुला करावा अशी आपली एमएसआरडीसीकडे मागणी होती. ही कामे लवकरच पूर्ण करून ३१ मेपर्यंत पलावा काटई पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. – राजेश मोरे, आमदार.