ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या स्वीय सहाय्यक या पदावर कार्यरत असणाऱ्या सौ. पल्लवी सरोदे (वय 37 वर्ष) यांचा रविवारी समुद्रात बुडून मृत्यू झाला. हरिहरेश्वर समुद्र किनारी सहलीनिमीत्त गेले असता पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कामावर असणाऱ्या पल्लवी सरोदे या कार्यालयीन मैत्रिणींसह त्या हरिहरेश्वर या ठिकाणी सहली निमित्त गेल्या होत्या. तेथील समुद्रात त्या उतरल्या असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. मात्र याच वेळी लाटेत अचानक त्या ओढल्या गेल्या. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

स्थानिक बचाव पथकाने आणि नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले. पल्लवी सरोदे या ठाणे जिल्हा प्रशासनात 2012 रोजी लिपिक या पदावर रुजू झाल्या होत्या. मार्च 2024 मध्ये त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली होती. त्या सध्या जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. पल्लवी सरोदे यांच्या मृत्यूने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाकडून हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.