ठाणे: महापालिकेच्या वतीने पं. राम मराठे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज, शुक्रवारपासून पुढील तीन दिवस हा महोत्सव गडकरी रंगायतनमध्ये होणार आहे. या महोत्सवात पं. सुरेश तळवलकर यांना राज्यस्तरीय तसेच निषाद बाक्रे यांना युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हे महोत्सव विनामूल्य असून त्याच्या प्रवेशिका गडकरी रंगायतन तसेच डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथून दिल्या जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिकेच्यावतीने दरवर्षी पं. राम मराठे संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा या महोत्सवाचे २८ वे वर्ष आहे. पं. राम मराठे यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने त्यांच्यासोबत काम केलेल्या सात ज्येष्ठ कलाकारांचा यावेळी कृतज्ञता सन्मान केला जाणार आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात पं. राम मराठे यांचे नातू युवा गायक भाग्येश मराठे यांच्या गायनाने होणार आहे. तर, ज्येष्ठ सतार वादक शुजात खान यांच्या सतार वादनाने पहिल्या दिवसाची सांगता होईल. या दोन्ही कार्यक्रमादरम्यान पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

हेही वाचा… ठाणे ते टिटवाळा दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३११ रेल्वे प्रवाशांवर कारवाई

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात ज्येष्ठ वादक भीमण्णा जाधव यांच्या सुंदरी वादनाने होणार आहे. या कार्यक्रमानंतर नृत्यांगना शर्वरी जमेनिस या कथ्थक नृत्याविष्कार सादर करणार आहेत. कार्यक्रमाची सांगता ज्येष्ठ गायिका शुभा मुदगल यांच्या गायनाने होईल. तिसऱ्या दिवशी युवा कलाकार शाश्वती चव्हाण यांचे गायन आणि मंजिरी वाठारे यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे. यानंतर, पं. राम मराठे यांचे पुत्र मुकुंद मराठे यांनी दिग्दर्शित केलेल्या संगीत मंदारमाला या नाटकाचा प्रयोग होणार आहे. या महोत्सवाची सांगता ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे-देशपांडे आणि ज्येष्ठ गायक पं. संजीव अभ्यंकर यांच्या ‘जसरंगी’ या अनोख्या कार्यक्रमाने होणार आहे. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून नागरिकांनी कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandit ram marathe music festival has been organized by thane municipal corporation from friday dvr