कर्करोगाला थांबवण्यासाठी तंबाखू आणि धूम्रपानावर नागरिकांनी स्वत:हून बंदी घालणे आवश्यक असून तंबाखूमुळेच कर्करोगाचे प्रमाण अधिक वाढले आहे, असे स्पष्ट प्रतिपादन कर्करोग तज्ज्ञ धनश्री मुंढे यांनी केले. मराठी विज्ञान परिषद अंबरनाथ शाखेतर्फे रविवारी संध्याकाळी येथील भगिनी मंडळाच्या शाळेत कर्करोगाबाबत आयोजित व्याख्यानानिमित्त त्या बोलत होत्या. डॉ. योगेश कुलकर्णी यांच्या हस्ते मुंढे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्रा. भगवान चक्रदेव आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

तंबाखूमुळे वाढणाऱ्या कर्करोगाबद्दल मार्गदर्शन करताना डॉ. मुंढे म्हणाल्या की, आपल्याकडे तंबाखू खाण्याचे विविध असे तब्बल ३३ प्रकार आहेत.

तंबाखू हे कर्करोगाला निमंत्रण देणारे आहे. त्याचप्रमाणे सिगारेट अर्थात धूम्रपान हेसुद्धा तितकेच घातक आहे. धूम्रपान करणाऱ्यांबरोबरच त्यांच्या मुखावाटे बाहेर पडणारा धूर आजूबाजूच्या नागरिकांना कर्करोगाच्या जाळ्यात सहज ओढू शकतो. मद्यपान आणि धूम्रपान हे दोन्ही एकत्र केल्याने कर्करोगाला अगदी पोषक असे वातावरण तयार होते. त्यामुळे धूम्रपान, मध्यपान आणि तंबाखू सेवन टाळणे म्हणजेच कर्करोगाला टाळणे होय असेही त्यांनी सांगितले. महिलांमध्ये कर्करोगाबाबत जागरूकता होत असून तिचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.