दिवाळीतील नवनव्या मिठायांना मागणी; साखरविरहित आणि ओट्स मिठायाही बाजारात

दिवाळीचा आनंद फराळामध्ये असला तरी, मिठायांनाही तोटा नसतो. त्यामुळेच दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर नवनवीन मिठाया ग्राहकांसमोर येत असतात. यंदाही तोच कल पाहायला मिळत आहे. पाणीपुरी काजू, ड्रायफ्रूट टाकोज, कॉफी डिलाइट, पाइनअ‍ॅपल पंच, शाही पानबहार, किसमिस आणि ड्रायफ्रूट अलास्का अशा खवय्यांना खुणावणाऱ्या मिठायांनी बाजार सजला आहे.

दिवाळीनिमित्त बाजारपेठा विविध वस्तूंनी फुलल्या असून ग्राहकांची मोठी गर्दी उसळल्याचे पाहायला मिळत आहे. नवे कपडे, फटाके यांसोबतच फराळ-मिठाईला देखील दीपोत्सवात वेगळे स्थान आहे. दिवाळीसाठी बाजारपेठेतील विविध मिठाईंच्या दुकानात फराळासोबत मिठाईचे विविध प्रकार ठेवण्यात आले आहेत. यंदा पारंपरिक मिठाईसोबत नवे प्रकारही मिठाईच्या दुकानात पाहायला मिळत आहेत. पाणीपुरी काजू, ड्रायफ्रूट टाकोज, कॉफी डिलाइट, पाइनअ‍ॅपल पंच, शाही पानबहार, किसमिस यासारखे विविध मिठाईचे पदार्थ ठाणे शहरातील मोठय़ा मिठाईच्या दुकानांमध्ये ठेवण्यात आले आहेत. कॉफी डिलाइट या मिठाईत चॉकलेट, कॉफी आणि सुका मेवा यांचे मिश्रण असून या मिठाईला सुक्या मेव्याने सजवण्यात आले आहे. या मिठाईची विक्री १५०० रुपये प्रति किलोने होत आहे.

ड्रायफ्रूट टाकोज या मिठाईला काजूचे आवरण असून त्यात सुका मेव्याचे सारण आहे. या मिठाईची विक्री देखील १५०० रुपये प्रति किलोने होत आहे. जेली टोस्ट ही जेलीचे पूर्ण आवरण असणारी मिठाई बाजारात १६०० रुपये प्रति किलोने मिळत आहे. तर, कलकत्ता पानबहार ही मिठाई १५०० रुपये प्रति किलो या दरात मिळत आहे. फॅन्सी काजू ही मिठाई

देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. यामध्ये काजू वापरून त्याला स्ट्रॉबेरी, बदाम, चॉकलेट इत्यादी आकार देऊन त्या मिठाईला सजवण्यात आले आहे. या मिठाईचे दर ११०० रुपये प्रती किलो इतके आहेत. रोझ रोल, सिल्व्हर टच, ओरिओ मॅजिक, जामुन बहार इत्यादी मिठाईंना मोठय़ा प्रमाणात मागणी असल्याचे दिसून येत आहे.

फळांच्या मिठाईलाही मागणी

सुक्या मेव्यासह फळांपासून तयार करण्यात आलेली मिठाई देखील मिठाईच्या दुकानात विक्रीसाठी आल्याचे पाहायला मिळते. आंबा आणि काजूचे मिश्रण असलेली मँगो मीलन ही मिठाई १५०० रुपये प्रति किलोप्रमाणे बाजारात मिळत आहे. अननसापासून तयार करण्यात आलेले पायनॅपल पंच, पेरू खजाना, ब्लू बेरी पंच, ऑरेन्ज वाटी यासारख्या विविध फळांपासून तयार करण्यात आलेल्या मिठाईलाही ग्राहकांकडून मागणी आहे. फळांपासून तयार करण्यात आलेल्या मिठाईची विक्री १५०० ते १६०० रुपये प्रति किलोने होत आहे.

साखरविरहित मिठाई

दरवर्षीपेक्षा यंदा अधिक प्रमाणात साखरविरहित मिठाई बाजारात विक्रीसाठी आल्याचे दिसून येत आहे. अंजीर, किवी, संत्री, बेरी, इत्यादी फळांपासून तयार करण्यात आलेली साखरविरहित मिठाई बाजारात विक्रीसाठी आहे. या मिठाईची विक्री १६०० रुपये प्रति किलो या दराने होत आहे. तसेच ओट्स थालिमार ही मिठाई यावेळी बाजारात उपलब्ध आहे.

या दिवाळीत मिठाईचे विविध प्रकार आले असून ग्राहकांची मागणी मोठय़ा प्रमाणात आहे. या दिवाळीत मिठाईचे दर बदलले नसून गेल्या वर्षीसारखेच असल्याने ग्राहकांचीही मिठाईला अधिक मागणी आहे. –  तिरथ जोशी, मिठाई विक्रेते, ठाणे