जुना रेल्वे पूल हलक्या वाहनांसाठी खुला करण्याचा मुद्दा ऐरणीवर
पाणजू बोट दुर्घटनेनंतर वसई खाडीवरील सध्या बंद असलेला जुना रेल्वे पूल हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हा पूल खुला झाल्यास पाणजूच्या रहिवाशांना मोठा दिलासा तर मिळणार आहेच, शिवाय भाईंदरहून वसईला तसेच वसईहून मुंबईला जाणाऱ्यांसाठी वेळेची बचत होणार आहे. मात्र या पुलाला जोडणाऱ्या भाईंदर पश्चिमेकडून थेट दहिसपर्यंत जाणाऱ्या लिंक रस्त्याचे रखडलेले काम या थेट प्रवासातला अडथळा ठरणार आहे.
वसई खाडीवर एमएमआरडीए नवा पूल बांधणार आहे, सोबतच दहिसर लिंक रस्त्याचे कामही एमएमआरडीए करणार आहे. मात्र या मार्गात येणारी तिवरांची झाडे, मीठ विभागाची परवानगी यामुळे या रस्त्याचे काम अद्याप मार्गी लागलेले नाही. सध्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे. दहिसर चेकनाक्यावरील वाहतूक कोंडी तर मोठीच डोकेदुखी ठरू लागली आहे. दुसरीकडे मीरा भाईंदरहून वसईला अथवा वसईहून मीरा भाईंदरला यायचे झाल्यास मुंबई अहमदाबाद महामार्गावरून मोठा वळसा घेऊन जावे लागते. यात वेळ आणि इंधन दोन्ही खर्च तर होतेच शिवाय वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून वसई खाडीवर नवा पूल बांधण्यासह दहिसर लिंक रस्ता बांधून वसई तालूका थेट मुंबईला जोडण्याचा प्रस्ताव पुढे आला. या दोन्ही प्रस्तावाला मंजुरीही मिळाली आहे. परंतु मीरा रोड ते दहिसर दरम्यान तिवरांची झाडे मोठय़ा प्रमाणावर असल्याने पर्यावरण विभागाची परवानगी आवश्यक आहे. सुभाषचंद्र बोस मैदान ते खाडी या दरम्यान मिठागरे असल्याने मीठ विभागाची परवानगी घेणे तसेच त्यांचे भूसंपादन करणे ही महत्त्वाची कामे पार पाडावी लागणार आहेत.
रस्त्याचे काम एमएमआरडीए करणार असली तरी या सर्व परवानग्या घेण्याची जबाबदारी महानगरपालिकेवर आहे. सध्या पर्यावरण विभागाची परवानगी अंतिम टप्प्यात आहे. परवानगी देणाऱ्या समितीने या रस्ता बांधणी कामासाठी तयार करण्यात आलेल्या प्रकल्प अहवालात काही सुधारणा सुचविल्या आहेत. तसेच या ठिकाणी असलेल्या तिवरांच्या संरक्षणासंदर्भात व त्यांच्या वाढीसाठी करायच्या उपाययोजनांचा अहवालात समावेश करण्याच्या सूचना समितीने दिल्या आहेत. त्याची पूर्तता झाल्यानंतर पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
मीठ विभागाची परवानगी मिळवणे हीदेखील मोठी जिकिरीची बाब आहे. या ठिकाणी काही खासगी मिठागरेदेखील आहेत, त्यांचेही भूसंपादन करावे लागणार आहे. ही सर्व अडथळ्यांची शर्यत पार पडल्यानंतर रस्त्याच्या कामाला गती मिळू शकणार आहे. वसई खाडीवरील पूल वाहनांसाठी खुला करण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नव्या पुलाच्या उभारणीला अवकाश असला तरी दहिसर लिंक रस्ता जुन्या पुलाला जोडता येणे शक्य आहे. त्यामुळे हा रस्ता तयार झाल्यास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ताण कमी होईलच, शिवाय पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते वसई दरम्यानच्या रेल्वे प्रवासाचा भार हलका होण्यास मदत होणार आहे. या दृष्टीने दहिसर लिंक रस्ता व सोबतच खाडीवरील नव्या पुलाचे अथवा जुना पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
असा असेल रस्ता
मुंबईतला लिंक रस्ता दहिसपर्यंत आलेला आहे. हा रस्ता पुढे पश्चिम दिशेने रेल्वेला समांतर थेट मिरा रोड व भाईंदर पश्चिमेकडील उड्डाणपुलापर्यंत येईल व त्यानंतर सुभाषचंद्र बोस मैदानाकडून पुढे खाडीपर्यंत जाणार आहे. मिरा रोड व दहिसर दरम्यान मोठय़ा प्रमाणावर तिवरांची झाडे आहेत त्यांचे संरक्षण होण्यासाठी झाडांवरुन उन्नत रस्ता बांधण्यात येणार आहे.