लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: येथील डोंबिवली विमेन्स वेलफेअर सोसायटी नया सयेरा या संस्थेच्या पुढाकाराने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध प्रांतातील शाळांमधील मुलांकडून रद्दी कागदांपासून कागदी पिशवी बनविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला संस्थेशी संबंधित महिला कार्यकर्त्या तसेच मुलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
विशेष म्हणजे संस्थेतर्फे या उपक्रमाची ऑनलाईन माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या उपक्रमात हिमाचल प्रदेशातील विद्यार्थी अधिक संख्येने सहभागी झाले आहेत. डोंबिवली, कल्याणसह महाराष्ट्राच्या कोकण, विदर्भ, खानदेश भागातील शाळकरी मुले या उपक्रमात सहभागी झाली आहेत, अशी माहिती डोंबिवली विमेन्स सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षा डाॅ. स्वाती गाडगीळ यांनी दिली.
हेही वाचा… ठाण्यातील विसर्जन घाटांची विकासकामे निकृष्ट दर्जाची; भाजपचे आमदार संजय केळकर यांचा आरोप
कागदी पिशव्या विद्यार्थ्यांनी बाजारपेठेतील फूल विक्रेते, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यांना निर्माल्य ठेवण्यासाठी, फूले विक्रीसाठी द्यावयाची आहेत. घरगुती गणेशभक्तांनाही या पिशव्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कागदी पिशवी पाण्यात विरघळते. त्यामुळे अधिकाधिक भाविकांनी पर्यावरण संवर्धनाचा विचार करुन, जलप्रदुषण टाळण्यासाठी कागदी पिशव्यांचा वापर करावा. या उद्देशातून मागील काही वर्षापासून सोसायटीतर्फे हा उपक्रम राबविला जातो, असे अध्यक्षा डाॅ. स्वाती गाडगीळ यांनी सांगितले.
हेही वाचा… कळवा रुग्णालयातून बाळाचा मृतदेह घेऊन वडिल पसार
मागील वर्षी या कागदी पिशव्यांना फूल विक्रेते, गणेश भक्तांकडून खूप मागणी आली होती. दरवर्षी कागदी पिशव्या बनविण्याच्या विद्यार्थी संख्येत भर पडत आहे. घरामध्ये रद्दी पेपर असतात. त्याचा वापर करुन विद्यार्थ्यांना अधिकाधिक पिशव्या तयार करुन त्या आपल्या परिसरात देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पर्यावरण संवर्धन हा एकमेव यामागील उद्देश आहे, असे संयोजिका डाॅ. गाडगीळ यांनी सांगितले. महिला सबलीकरण, स्वयंरोजगार, स्वच्छता, आरोग्य या विषयावर डोंबिवली विमेन्स वेलफेअर सोसायटीचे काम राज्याच्या अनेक भागात सुरू आहे.