येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला उल्हासनगरचा माजी आमदार सुरेश उर्फ पप्पू कलानी, बच्चू पांडे यांना विठ्ठलवाडी पोलिसांकडून पुणे ते कल्याण रस्त्यावरुन प्रवासादरम्यान संरक्षण मिळत नसल्याने, या दोन्ही गुन्हेगारांना न्यायालयासमोर हजर करता येत नाही, अशी माहिती येरवडा कारागृह अधिकाऱ्यांतर्फे बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाला देण्यात आली. पांडेला जर अन्य एका गुन्हेप्रकरणात कल्याण न्यायालयात आणले जाते, तर मग अन्य खटल्यात त्याला का हजर केले जाऊ शकत नाही, असा प्रश्न अॅड. संदीप पासबोला यांनी उपस्थित करताच, न्यायालयाने पुणे पोलिसांचे संरक्षण घेऊन दोन्ही आरोपींना पुढील तारखेला न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले.
उल्हासनगरमधील घनश्याम भतिजा खून प्रकरणाची सुनावणी कल्याण सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. झेड. मिर्झा यांच्यासमोर सुरु आहे. या दोघांना सुनावणीसाठी न्यायालयासमोर वेळोवेळी हजर करायचे आहे. बुधवारी येरवडा तुरुंग व्यवस्थापनातर्फे एक पत्र न्यायालयासमोर ठेवण्यात आले. यामध्ये या दोघांना एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे आणि ते येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहेत, असे म्हटले आहे. कलानी, पांडेला यापूर्वी दोन वेळा कल्याण न्यायालयात भटिजा खून प्रकरणातील सुनावणीसाठी हजर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीही त्यांना का हजर करण्यात आले नाही, असा सवाल न्यायालयाने केला. त्यावेळी विठ्ठलवाडी पोलिसांतकडून या दोन्ही आरोपींना पुण्याहून कल्याणपर्यंत आणण्यासाठी जे पोलीस संरक्षण मिळणे आवश्यक आहे, ते वारंवार मागणी करुनही मिळत नसल्याने, आरोपींना न्यायालयात हजर करता येत नाही, असे तुरुंग अधिकाऱ्यांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.
अन्य खटल्यात हजर
अॅड. पासबोला यांनी अन्य खटल्यात पांडेला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते, असे सांगितले. मग, विशेष सरकारी वकिल विकास पाटील यांनी या महत्वाच्या खटल्यासाठी त्यांना का हजर केले जात नाही, असा प्रश्न केला. न्यायालयाने पुणे पोलिसांकडून संरक्षण घेऊन या दोघांना ११ एप्रिलच्या सुनावणीच्या वेळी हजर करण्याचे आदेश दिले.
तुरुंग अधिकाऱ्यांच्या या प्रकरणात हालचाली संशयास्पद वाटत असल्याने ते आरोपींना हजर करीत नसावेत, अशी प्रतिक्रिया अॅड. पाटील यांनी ‘लोकसत्ता ठाणे’ला दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा