भावी महापौर म्हणून ओमी यांच्या पत्नीच्या नावाने घोषणाबाजी

दोन पत्नींकडून तीन अपत्ये असल्याने निवडणूक लढविण्याचा अधिकार गमावून बसलेले उल्हासनगरातील कलंकित नेते ओमी कलानी यांनी पत्नी पंचम यांना निवडणूक िरगणात उतरविले असून प्रचारात कलानी समर्थक उल्हासनगरच्या ‘भावी महापौर’ असा त्यांचा उल्लेख करू लागले आहेत. आधीच कलानी कुटुंबाशी जवळीक केल्याबद्दल नाराज असलेले भाजपमधील जुने कार्यकर्ते या घडामोडींमुळे आणखी अस्वस्थ झाले आहेत.

उल्हासनगरचे आगामी महापौरपदही महिलांसाठी राखीव झाले आहे. येथे भाजप आणि ओमी यांच्यात आघाडी  आहे. ओमी यांनी पत्नी पंचम यांनाही िरगणात उतरविले होते.  ओमी समर्थक उमेदवार भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्टय़ा हे सर्व भाजपचे उमेदवार ठरले आहेत.

पंचम यांचा प्रचार करताना ओमी समर्थक त्यांचा उल्लेख ‘भावी महापौर’ असा करू लागल्याने भाजपमधील एक मोठा गट अस्वस्थ बनला आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे येथील कलानी कुटुंबाच्या सत्तेचा पाडाव केला होता. असे असताना भाजपच्या मदतीने पुन्हा एकदा महापौरपदाच्या बोहल्यावर चढण्याची तयारी कलानी कुटुंबाने केल्याने येथील कुमार आयलानी गटात नाराजीचा सूर आहे. या पदासाठी भाजपमधून कुमार आयलानी यांच्या पत्नी मीना तसेच प्रकाश मखिजा यांच्या पत्नी जया यांची नावेही चर्चेत आहेत. असे असताना पंचम यांचे नाव जोरकसपणे पुढे करत ओमी यांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केल्याने कलानी, मखिजा यांची नावे मागे पडतात की काय असे चित्र आहे. यासंबंधी जो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे कुमार आयलानी यांनी सांगितले. ओमी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. रवींद्र चव्हाण यांनी मोबाइल उचलला नाही.

Story img Loader