व्यवहारासाठी इंग्रजी भाषा महत्त्वाची आहे. ती भाषा आलीच पाहिजे. आपल्या स्थानिक भाषेचा प्रत्येकाला अभिमान पाहिजे. मी स्वत: गोव्याकडची असल्याने कोकणी भाषेचा मला अभिमान आहे. अलीकडे इंग्रजी भाषेचे अनावश्यक महत्त्व वाढवून राष्ट्रभाषा, मातृभाषेचे महत्त्व कमी करण्यात येत आहे. या सगळ्या व्यवस्थेला पालक वर्ग सर्वाधिक जबाबदार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री वर्षां उसगावकर यांनी येथील सार्वजनिक वाचनालयात आयोजित कार्यक्रमात नुकतेच केले.
‘मुलाखत गप्पा आणि गौरव’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा प्रत्येकाला आल्या पाहिजेत. बाहेरच्या जगात वावरण्यासाठी या भाषा महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या मातृभाषेचा अभिमानही आपण ठेवला पाहिजे. तो अलीकडे शिक्षणाच्या स्पर्धेत मागे पडत आहे. मुलांना इंग्रजी शाळेत टाकण्याची मोठी लाट आली आहे. या लाटेत आपण आपली मातृभाषा विसरत आहोत, अशी खंत उसगावकर यांनी व्यक्त केली. मुलाखती दरम्यान वर्षां यांनी आपला जीवनपट उलगडला.
या वेळी महापौर राजेंद्र देवळेकर, अध्यक्ष राजीव जोशी, भिकू बारस्कर, मिलिंद कुलकर्णी, चित्रपट दिग्दर्शक सचिन पारेकर, कलादिग्दर्शक विनोद गुरुजी, क्रिकेटपटू प्रणव धनावडे उपस्थित होते. ‘शेजारी’ चित्रपटाच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीनिमित्त या वेळी विनोद गुरुजी, सचिन व संजय पारेकर यांचा, तसेच प्रणवचा सत्कार करण्यात आला.

Story img Loader