ठाणे – येथील वसंत लॉन्स भागातील न्यू होरायझन शाळा प्रशासनाने अचानकपणे शुल्कात वाढ केल्याचा आरोप करत, पालकांनी शनिवारी सकाळी शाळेच्या परिसरात आंदोलन केले. या शाळेच्या इतर शाखांमध्ये शुल्क कमी आकारले जात असल्याचा दावा करत या शाळेने वाढवलेले शुल्क रद्द करा किंवा सर्व सुविधा उपलब्ध करून द्या अशी मागणी पालकांनी यावेळी केली. दरम्यान या संदर्भात शाळा प्रशासनाशी वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
ठाण्यात वसंत लॉन्स भागात न्यू होरायझोन शाळेची शाखा आहे. या शाळा व्यवस्थापनाने यंदाच्या शैक्षणिक वर्षात शालेय शुल्कात १५ टक्के वाढ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या शुल्क वाढीविरोधात पालकांनी शनिवारी शाळेच्या परिसरात आंदोलन केले. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अचानकपणे करण्यात आलेल्या शुल्क वाढीचा पालकांनी निषेध नोंदवला. शाळा व्यवस्थापनाने यंदाच्या शैक्षणिक वर्षात शालेय शुल्कात १५ टक्के वाढ केली आहे. या शुल्काबरोबरच पुस्तके, गणवेश, बस गाडीचे भाडे तसेच इतर शैक्षणिक साहित्यासाठी वेगळे पैसे भरावे लागत असल्याचे पालकांकडून यावेळी सांगण्यात आले. या शाळेच्या ठाणे परिसरात इतर ठिकाणीही शाखा आहेत. ही शाखा वगळता इतर शाखांकडून ६२ हजार ते ८४ हजार इतके शुल्क आकारले जाते. मात्र वसंत लॉन्स येथील शाखेत मात्र एक लाख शालेय शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे इतर शाखांच्या तुलनेत येथे शालेय शुल्क जास्त असल्याचे पालकांनी सांगितले. शालेय शुल्क कमी करा अथवा त्यात सर्व सुविधांचा अंतर्भाव करून घ्यावा अशी मागणी पालकांनी आंदोलना दरम्यान केली. दरम्यान सोमवारी शुल्क वाढी संदर्भात शाळा व्यवस्थापनाची भेट घेणार असल्याचे पालकांनी यावेळी सांगितले. दरम्यान या संदर्भात शाळा प्रशासनाशी वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.