लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : येथील चरई भागात असलेल्या श्रीमावळी मंडळ शाळेत डिजीटल फळ्यासाठी ‘सुविधा शुल्क’च्या नावाखाली अतिरिक्त शुल्काची मागणी केल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या शुल्कास विरोध करणाऱ्या पालकांना विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा इशारा शाळेकडून दिला गेला असून, उत्तरपत्रिका देखील दाखविल्या नसल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेच्या या निर्णयाविरोधात पालकांनी शुक्रवारी एकत्रित येत शाळेच्या आवारात आंदोलन केले. तसेच शिक्षणअधिकाऱ्यांना निवेदन देखील दिले.
शाळेने सुविधा शुल्क च्या नावाखाली पहिलीच्या वर्गासाठी दरवर्षी दहा हजार रुपये तर, इतर वर्गांसाठी वेगवेगळ्या रक्कमा आकारण्यास सुरुवात केली आहे. शाळेने २०२४ मध्ये आधीच १५ टक्के शुल्क वाढ केली होती. त्यामुळे नव्याने लावलेले सुविधा शुल्क हे पालकांच्या आर्थिक मर्यादांच्या बाहेर असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, काही पालकांकडून ही रक्कम रोख स्वरूपात घेऊन कोऱ्या कागदावर पावती देण्यात आली असून, त्यावर शाळेचे नाव किंवा शिक्काही नसल्याची तक्रार काही पालकांनी केली आहे.
शाळेने २२ एप्रिल रोजी पालक सभेचे आयोजन केले होते. या सभेत विद्यार्थ्यांच्या परिक्षेच्या उत्तर पत्रिका पालकांना दाखविल्या जाणार होत्या. परंतू, ज्या पालकांनी हे सुविधा शुल्क भरले नाहीत, त्या पालकांना त्यांच्या मुलाच्या उत्तरपत्रिका दाखविण्यात आल्या नाहीत, तसेच काही पालकांकडून शुल्क कधी भरणार याबाबत लेखी पत्र घेण्यात आले. यामुळे पालकांमध्ये संताप आणि अस्वस्थता पसरली आहे. या पालकांनी एकत्रित येत शुक्रवारी शाळेच्या आवारात आंदोलन केले. तसेच हे सुविधा शुल्क ऐच्छिक ठेवावे किंवा ते कमी करून सर्वसामान्य कुटुंबांना परवडेल असे आरावे अशी मागणी करत, शाळेच्या विकासात्मक धोरणांना पालकांचा पाठिंबा आहे. मात्र, सक्तीची वसुली अन्यायकारक असल्याचेही पालकांनी स्पष्ट केले.
याविरोधात पालकांनी शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या भेटीत पालकांनी शाळेच्या दबाव तंत्राबद्दल सविस्तर माहिती दिली. डावखरे यांनीही याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.