मनमानी शुल्क आकारून ठाण्यातील जलतरणपटूंच्या क्रीडा कारकीर्दीवरच घाला घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘ठाणे क्लब’शी तडजोड करण्यासाठी या मुलांच्या पालकांनीच पुन्हा पुढाकार घेतला आहे. या ठिकाणी पोहण्याचा सराव करण्यासाठी येणाऱ्या जलतरणपटूंना जुनेच शुल्क आकारावे, लहान मुलांना अत्यल्प दरात जलतरणाची सुविधा पुरवावी, अशा विविध मागण्यांचा प्रस्ताव पालकांनी ठाणे क्लबच्या जुन्या व नव्या व्यवस्थापनासमोर ठेवला आहे. मात्र, अद्याप व्यवस्थापनाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
 ठाणे शहरातील महापालिकेची मालकी असलेल्या ‘ठाणे क्लब’मधील शुल्कवाढीमुळे जलतरणपटूंना गेल्या पाच महिन्यांपासून सरावाला मुकावे लागत आहे. या पाश्र्वभूमीवर या मुलांच्या पालकांनी सविनय सत्याग्रहाचा मार्ग अवलंबून तरणतलावामध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ठाणे क्लबने या जलतरणपटूंना तरणतलाव खुला केला. तसेच शुल्क व अटींसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली. या बैठकीत पालकांनी व्यवस्थापनाकडे नवा प्रस्ताव दिला आहे. मात्र या बैठकीमध्ये प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे आश्वासन दिले नाही. याविषयी ठाणे क्लबचे प्रोजेक्ट हेड दीपक जैन यांच्याशी संपर्क साधला असता. पालकांच्या मागण्या गणेशानंद डेव्हलपर्सकडे पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader