रिअॅलिटी शो हे उस्फूर्तपणाचा आव आणत असले तरी त्यालाही निश्चित अशी संहिता असते. याचा मी स्वत: अनुभव घेतला आहे. लहान मुलांचे रिअॅलिटी शो हे अधिक धक्कादायक संहितेवर आधारभूत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या मालिकांमध्ये आपल्या मुलांना सहभागी करताना पालकांनी अधिक विचार करावा, असे ठोस प्रतिपादन अभिनेता चिन्मय मांडलेकर याने डोंबिवली येथे केले.
वेध अॅकॅडमीच्या पुढाकाराने डोंबिवलीतील आनंद बालभवन येथे चिन्मय मांडलेकर यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिन्मयचे सासरे मदन जोशी यांनी त्याची मुलाखत घेतली. यावेळी चिन्मयने रिअॅलिटी शोचे अनेक पैलू उपस्थित पालक आणि त्यांच्या पाल्यांपुढे सादर केले. चिन्मय  म्हणाला, रिअॅलिटी शो टीआरपी मिळविण्यासाठी आखलेले असतात आणि त्यामुळे त्यांची निश्चित अशी संहिता ठरलेली असते. अनेकदा जी मुले मनोरंजन उत्तम प्रकारे करू शकतील त्यांना पुढच्या फेरीत ढकलले जाते. त्यांच्या दृष्टीने मुलांमधील गुणवत्ता हेरणे हा एकमेव मुद्दा नसतो. तर टीआरपी मिळविण्यासाठी केलेली ती धडपड असते. त्यामुळे यात यश किंवा अपयश आले तरी ते मुलांचे अपयश नसून त्या संहितेचे ते यश किंवा अपयश असते हे लक्षात ठेवायला हवे, असा सल्ला चिन्मयने यावेळी दिला. या शोमधून मुलांच्या व्यक्तिमत्त्वात नक्कीच बदल होतो, असेही त्याने स्पष्ट केले.
स्वप्न पाहायला व त्यात रमायला आवडत असल्याने आत्तापर्यंतचा प्रवास उत्तमरीत्या झाल्याचे तो म्हणाला. महाविद्यालयीन जिवनात केवळ वेळ घालवायचा म्हणून नाटकात काम करत असे. केवळ करून पाहायचे म्हणून नाटकांत मिळेल ते काम केले. त्यामुळे मी जेव्हा माझे आत्मचरित्र लिहीन तेव्हा त्याचे शीर्षक हे मागणी तसा पुरवठा हे ठरलेले आहे, असे चिन्मय याने यावेळी मिश्किलपणे सांगितले. ज्येष्ठ अभिनेते निर्मल पांडे यांच्या अभिनय कार्यशाळेत भाग घेतला आणि तेव्हापासून या क्षेत्रात आपले करिअर करण्याचा विचार पक्का केला. भूमिकेचा विचार करूनच मी त्या निवडतो. त्यामुळे नकारात्मक भूमिका करूनही प्रेक्षक माझ्यावर तितकेच प्रेम आजही करत आहेत. अभिनय, लेखन, दिग्दर्शन या तिन्ही भूमिका पार पाडतो, त्यात मी दिग्दर्शक म्हणून जास्त चांगले काम करतो असे मला वाटत असले तरी लेखन व अभिनय क्षेत्रात शेवटच्या श्वासापर्यंत काम करायला आवडेल असेही चिन्मय याने स्पष्ट केले.
वादळवाट मालिकेने एक वेगळीच ओळख निर्माण करून दिल्याचे चिन्मय याने सांगितले. यावेळी चित्रपट व मालिकांमध्ये काम करणाऱ्या वेध अॅकॅडमीच्या बालकलाकारांचा चिन्मय याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वेध अॅकॅडमीचे संचालक संकेत ओक यांनी अॅकॅडमीची माहिती दिली. या कार्यक्रमाला राम कोल्हटकर हेही उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लेखक अभय परांजपे यांच्या मार्गदर्शनामुळे मी लेखनाकडे वळलो, त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. दुर्दैवाने आज आपल्याकडे लेखन कसे करावे असे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था किंवा कोणते कोर्सेस उपलब्ध नाहीत. परांजपे यांच्या नावे लेखन अकादमी सुरू करण्याची माझी इच्छा आहे. वेगवेगळ्या नाटक, मालिका, सिनेमा, लघुपट यांचे लेखन हे वेगळ्या धाटणीचे असून ते कसे करावे याचे शिक्षण मिळाले तर अनेक मुले यात भविष्य घडवू शकतील.
– चिन्मय मांडलेकर

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parents should think more about their children while participating in reality show