ठाणे : शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजूस असलेल्या सेवा रस्त्यांवर मोफत वाहने उभी करण्याची सुविधा गेल्या दोन दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ही सुविधा नितीन कंपनी ते तीन हात नाका आणि नितीन कंपनी ते ज्ञानसाधना महाविद्यालय अशी दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर सुरू करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात माजिवाड्यापर्यंतच्या सेवा रस्त्यांवर अशी सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिका क्षेत्रात पुरेशा वाहनतळाची सुविधा उपलब्ध नाही. परिणामी, शहरातील रस्त्यांवरच नागरिक वाहने उभी करतात. या वाहनांचा वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या निर्माण होते. रस्त्यावर बेकायदा पार्किंग केलेल्या दुचाकी उचलून नेण्याची कारवाई वाहतूक शाखेकडून करण्यात येते. तर, चारचाकी वाहनांना जॅमर लावण्याची कारवाई करण्यात येते. आधी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्या आणि त्यानंतरच वाहनांवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येते. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र होते. वाहनतळ नसल्याने वाहने कुठे उभी करायची असा प्रश्न नागरिकांना पडतो.
हेही वाचा – कोपर रेल्वे स्थानकातील नवीन पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला
वाहनांवर कारवाई करण्यावरून चालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये वाद होतो. हे सर्व टाळण्यासाठी ठाणे महापालिकेने सेवा रस्त्यांवर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार तीन हात नाका ते माजिवाड्यापर्यंतच्या सेवा रस्त्यांवर वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ही सुविधा नितीन कंपनी ते तीन हात नाका आणि नितीन कंपनी ते ज्ञानसाधना महाविद्यालय अशी दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर सुरू करण्यात आली. या ठिकाणी पार्किंग क्षेत्र निश्चित करण्यात आले असून त्याठिकाणी पिवळ्या रंगाचे पट्टे मारले आहेत. ५० मीटर अंतरावर पार्किंग क्षेत्र तयार करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पार्किंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या भागात काही ठिकाणी वळण रस्ते आहेत. याठिकाणी अपघातांची शक्यता लक्षात घेऊन याठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.