ठाणे स्थानकाबाहेरील वाहनतळाचे काम निधीअभावी अपूर्ण; अर्थसंकल्पाकडे डोळे
ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा गाजावाजा करत सुरू केलेले वाहनतळाचे काम निधीअभावी रखडले आहे. या दुमजली वाहनतळात किमान अडीच हजार वाहने उभी करता येणार आहेत. मात्र तळ आणि पहिल्या मजल्याचे काम पूर्ण झाल्यानंतर निधीअभावी उर्वरीत कामे रखडली आहेत. त्यामुळे गुरुवारी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात तरी या वाहनतळासाठीच्या निधीची तरतूद होईल का, याकडे रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले आहे.
कंत्राटदाराची चणचण, निधीचा तुटवडा यांमुळे ठाणे स्थानकालगतचे हे वाहनतळ गेली तीन वर्षे सतत चर्चेत राहिले आहे. हे वाहनतळ २०१६ मध्ये पूर्ण करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले होते. मात्र सुरुवातीपासूनच अपुऱ्या निधीमुळे कामे रखडत गेली. याबद्दल प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागल्यानंतर अर्धवट उभारलेल्या वाहनतळाचा तळमजला दुचाकी पार्किंगसाठी खुला करण्यात आला. उर्वरीत कामेही लवकर पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात या आघाडीवर काहीच कामे झालेली नाहीत. वाहनतळाच्या वरच्या मजल्यांच्या अर्धवट बांधलेल्या जागेचा वापर आता गर्दुल्ले आणि मद्यपी करू लागले आहेत. त्यामुळे या ठिकाणी दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या थोटुकांचा खच पडलेला दिसून येतो.
दरम्यान, यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता, निधीअभावी कामे रखडल्याचे सांगण्यात आले. येत्या १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात या निधीची तरतूद झाल्यास पुढील कामे वेगाने पूर्ण करण्यात येतील, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.
पूर्ण क्षमतेची प्रतीक्षा
रेल्वे स्थानक परिसरात पश्चिमेकडील बाजूस वाहने उभी करण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने स्थानक परिसरात तब्बल ५ कोटी ५० लाखांची तरतूद करून वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अडीच हजार वाहनांची क्षमता असलेल्या या वाहनतळात सध्या तळमजल्यावर एक हजार दुचाकी उभ्या रहातील, अशी व्यवस्था आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा पडणारा भार लक्षात घेता वाहनतळाची क्षमता वाढवावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.
पुढील अर्थसंकल्पात या वाहनतळासाठी निधीची तरतूद करून या वाहनतळाचे लोकार्पण केले जावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेली तीन वर्षे रखडलेले हे काम येत्या काही काळातच पूर्ण व्हावे अशी मागणी आम्हीदेखील करत आहोत. यंदाच्या अर्थसंकल्पात हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास आहे.
– राजन विचारे, खासदार