ठाणे शहरात वाहनतळाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या बिकट होऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने शहरातील नाल्यावर वाहनतळ उभारण्याचा आखलेला बहुचर्चित प्रकल्प अखेर पूर्णत्वाच्या मार्गावर असून नाल्यांवरील हे वाहनतळ एप्रिल महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. वाहनतळासाठी पुरेशा जागा नसल्याने नाले बंदिस्त करून पार्किंग जागा तयार करण्याचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबईसारख्या शहरात मोठे नाले बंदिस्त करून सुमारे ५०० वाहनांचे वाहनतळ सुरू करण्यात आले आहे. नवी मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात राबविण्यात आलेला हा पहिला प्रकल्प किती यशस्वी ठरतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
ठाणे शहरात वाहनतळांची संख्या अतिशय मर्यादित आहे. महापालिका मुख्यालयाच्या आवारातही वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे सर्वसाधारण सभा तसेच अन्य महत्त्वाच्या दिवशी या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. या पाश्र्वभूमीवर अभियांत्रिकी विभागाने दोन वर्षांपूर्वी नाले बंदिस्त करून वाहनांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. ठाणे महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलावाजवळील नाल्यावर स्लॅब टाकून ३० चारचाकी वाहनांकरिता वाहनतळ उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या वाहनतळाचे काम अखेरच्या टप्प्यात असून एप्रिल महिनाअखेर तो वाहनासाठी खुला होणार आहे. यामुळे महापालिका मुख्यालय परिसरात रस्त्यांवर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टळणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. एप्रिलअखेर हे वाहनतळ वाहनासाठी खुले होईल, अशी माहिती महापालिकेचे प्रभारी नगर अभियंता रतन अवसरमोल यांनी दिली.
 महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी शहरात पार्किंग प्लाझा आणि पार्किंग धोरण राबविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार शहरातील रस्त्यांचे वर्गीकरण करून तिथे पार्किंग लॉट तयार करण्यात येणार होते. तसेच या धोरणामध्ये तत्कालीन नगर अभियंता के. डी. लाला यांनी नाल्यावर वाहनतळ उभारण्याची संकल्पना मांडली होती. दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पार्किंग धोरण राबविण्याकरिता सुमारे दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.   

Story img Loader