असहकार करणाऱ्या ठेकेदाराला बाद करणार; नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याची वेळ

खास प्रतिनिधी, ठाणे</strong>

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या शहरातील रस्त्याच्या कडेला वाहने उभी करण्याची व्यवस्था निर्माण करून संबंधित चालकांकडून पार्किंग शुल्क आकारण्याची योजना महापालिका प्रशासनाने राबविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी दीड वर्षांपूर्वी निविदा पक्रिया राबवून ठेकेदाराची नेमणूकही केली. मात्र, ठेकेदाराने बँक गॅरंटी भरण्यास टाळाटाळ केल्याने ही योजना अजूनही कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता या ठेकेदाराला बाद करून पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया करण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला असून या प्रक्रियेमुळे योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणखी काही महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पुरेशा वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेकजण रस्त्यावर बेकायदा वाहने उभी करतात. त्यात व्यवस्थितपणे वाहने उभी करण्यात येत नसल्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते.

त्याचबरोबर अनेक जुन्या गृहसंकुलांमध्ये पुरेशा पार्किंगची व्यवस्था नसून या संकुलांमधील वाहने रात्रीच्या वेळेस रस्त्यावर उभी केली जातात. या सर्वाच्या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरातील रस्त्याच्या कडेला वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण करून चालकांकडून पार्किंग शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता.

या योजनेसाठी प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरातील सुमारे १७७ रस्त्यांची विभागणी अ, ब, क, ड अशा चार संवर्गात करण्यात आली होती. या चार संवर्गानुसार पार्किंग शुल्काचे दरही ठरविण्यात आले होते. त्यापैकी ‘अ’ संवर्गातील रस्त्यांवरील पार्किंग शुल्क महाग ठेवण्यात आले होते.

या प्रस्तावास सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदाराची नेमणूक केली होती. असे असले तरी ही योजना प्रत्यक्षात सुरू होऊ शकलेली नाही.

या संदर्भात महापालिकेचे कार्यकारी अभियंता विकास ढोले यांच्याशी संपर्क साधला असता, पार्किंग योजनेसाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने अद्याप बँक गॅरंटीची रक्कम जमा केली नसल्यामुळे योजनेची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच याबाबत आता वरिष्ठांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस-चालक वाद

पार्किंग योजनेच्या अंमलबजावणीसाठी शहरातील रस्त्यांवर पिवळ्या पट्टय़ांची आखणी करण्यात आली होती. तसेच काही ठिकाणी पार्किंगचे फलकही लावण्यात आले होते. या ठिकाणी नागरिक वाहने उभी करत आहेत. मात्र, ही योजनाच प्रत्यक्षात सुरू झालेली नसली तरी अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईवरून चालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये वाद होत आहेत.

सत्ताधाऱ्यांना भीती?

जुन्या ठाणे शहरात रस्त्याकडेला वाहने उभी करण्याचे प्रमाण मोठे आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी सम-विषय पार्किंग व्यवस्था अमलात असली तरी शुल्क आकारणी होत नाही. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे शुल्क आकारणी सुरू झाल्यास नागरिकांचा रोष ओढविण्याची भीती सत्ताधारी शिवसेनेला आहे. महापालिका प्रशासनाने मात्र ही योजना अमलात आणण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत.

Story img Loader