नौपाडा भागातील रस्त्यांच्या कडेला दिवसभर वाहने उभी ठेवणाऱ्यांना आता फार खबरदारी घ्यावी लागणार आहे. या भागातील संभाजी पथ ते घंटाळी या मार्गावर १ जूनपासून सकाळी ६ ते दुपारी ३ आणि ३ ते रात्री १२ या वेळेत रस्त्याच्या वेगवेगळय़ा बाजूला पार्किंगसाठी परवानगी देण्याचा निर्णय वाहतूक पोलीस विभागाने घेतला आहे. परिसराबाहेरील वाहनांच्या पार्किंगविरोधात स्थानिकांनी चालवलेला लढा यशस्वी ठरला असला तरी हा नवा नियम स्थानिकांनाही पाळावा लागणार आहे.
  नौपाडा परिसरातील रस्त्यांवर वाहने उभी करून लोकल पकडण्यासाठी ठाणे स्थानक गाठणाऱ्यांविरोधात स्थानिक रहिवाशांनी गेल्या काही दिवसांपासून एल्गार पुकारला आहे. परिसराबाहेरील वाहनचालकांकडून सकाळपासून संध्याकाळपर्यंत या रस्त्यांवर वाहने उभी केली जात असल्याने स्थानिकांना त्यांची वाहने उभी करण्यासाठी जागा मिळत नाही.   यातूनच ‘स्थानिक विरुद्ध बाहेरचे’ अशा नव्या वादाला तोंड फुटले होते. काही दिवसांपूर्वी गृहराज्यमंत्री (शहर) डॉ. रणजित पाटील हे ठाण्यात आले असताना नौपाडय़ातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने डॉ. पाटील यांच्याकडे ही तक्रार मांडली होती. तसेच पुणे शहरात राबवण्यात येणाऱ्या ‘ठरावीक वेळेसाठीच्या पार्किंग’चे धोरण येथेही राबवण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यावर पाटील यांनी असे धोरण राबवता येईल का, हे तपासण्याची सूचना वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना केली होती.
त्यानुसार, ठाणे वाहतूक पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर ‘ठरावीक वेळेपुरते पार्किंग’ असे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ जूनपासून संभाजी पथ ते घंटाळी या मार्गावर सकाळी आणि दुपारी वेगवेगळय़ा बाजूला पार्किंगसाठी परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या संदर्भात ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. ‘स्थानिक नागरिकांच्या आग्रहामुळे १५ दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर हे धोरण राबविण्यात येणार आहे. हा बदल कायमस्वरूपी करायचा का, याचा निर्णय आढाव्यानंतर घेतला जाईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील अन्य भागांतून येणारी अनेक वाहने सकाळी उभी राहात असून ती सायंकाळनंतर तेथून काढली जातात. नव्या धोरणानुसार ठरलेल्या वेळेत ही वाहने दुसऱ्या ठिकाणी पार्क केली नाही, तर त्या वाहनांवर कारवाई होणार आहे. मात्र, या नियमाचा फटका स्थानिकांना बसण्याची चिन्हे आहेत.
नियम काय?
*संभाजी पथ ते घंटाळी या मार्गावर पूर्वीपासून सम-विषम तारखांनुसार पार्किंग केली जाते. यात बदल करून तारखांऐवजी वेळेनुसार वर्गीकरण करण्यात येईल.
*सकाळी ६ ते दुपारी ३ या वेळेत रस्त्याच्या एका बाजूला वाहने उभी राहणार आहेत, तर दुसऱ्या बाजूचा रस्ता मोकळा असणार आहे, तर दुपारी ३ ते रात्री १२ या वेळेत दुसऱ्या बाजूला वाहने उभी करण्यास परवानगी असेल.

Story img Loader