परोपकार संस्था
ज्या समाजात जन्म घेतला, ज्या समाजात नावारूपाला आलो त्या समाजाचे ऋण फेडणे, त्या समाजाचा उतराई होणे हे आपले कर्तव्य आहे या उदात्त विचारातून २० वर्षांपूर्वी स्थापन झाली परोपकार ही संस्था. संस्थेची मूळ स्थापना मुंबईत झाली असली तरी गेल्या वीस वर्षांत तिचे कार्य विस्तारले असून मीरा-भाईंदरमध्येही ‘परोपकार’चे समाजकार्य मोठय़ा स्तरावर सुरू आहे.
१९९८ मध्ये मुंबईतील काही व्यापारी एकत्र आले. समाजासाठी काही तरी भरीव कार्य करण्याच्या उद्देशाने त्यांनी परोपकार या सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेची स्थापना केली. संस्थेचे कार्य हळूहळू वाढत गेले. त्यामुळे संस्थेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संस्थेच्या भाईंदर, ठाणे, बोरिवली, मालाड आणि दक्षिण मुंबई अशा चार क्षेत्र१य समित्यांची स्थापना करण्यात आली. अन्न आणि जलसेवा, चिकित्सा सेवा, शिक्षण सेवा, कन्या विवाह आणि गोसेवा हे संस्थेचे पाच मुख्य उद्देश आहेत.
विविध धार्मिक कार्यक्रम आणि महोत्सवात अन्न आणि जलसेवा संस्थेकडून दिली जाते. गणेशोत्सवात निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये वडापावचे वाटप आणि पिण्याच्या पाण्याची सोय हे त्याचे एक उदाहरण आहे. एकटय़ा मुंबईत लाखो वडापावचे वाटप या वेळी केले जाते. भाईंदर येथे दर वर्षी होणाऱ्या केशवसृष्टी महोत्सवातही संस्थेकडून अन्न प्रायोजित केले जाते. चिकित्सा सेवेत विविध प्रकारच्या आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. संपूर्ण शारीरिक तपासणीसोबतच मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केली जाते. मीरा-भाईंदरमध्ये संस्थेने भक्ती वेदांत रुग्णालयाच्या मदतीने अनेक रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ दिला आहे. याशिवाय गरीब रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी अडीच ते दहा हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत केली जाते, तसेच कर्करोग आणि हृदयरोगासाठीही आर्थिक मदत केली जाते.
शिक्षण सेवेमध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च, शैक्षणिक साहित्य दिले जाते. गरीब आणि गरजू शालेय विद्यार्थ्यांना दर वर्षी वह्य़ांचे वाटप केले जाते, तसेच ज्या कुटुंबांची ऐपत नाही अशा कुटुंबांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्कही संस्थेकडून दिले जाते. मीरा-भाईंदरमधील १०० ते १५० विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत असतो. शिवाय गरीब कुटुंबातील ८० टक्क्यांवर गुण प्राप्त करणाऱ्या मुलींना संस्था १० हजार रुपयांची मदतही करते. याशिवाय प्रत्येक क्षेत्रीय समितीला त्यांच्या जवळच्या गावात जाऊन शैक्षणिक संस्थांना मदत करण्याची मुभा दिली जाते. भाईंदर समिती दर वर्षी जवळच्या आदिवासी क्षेत्रात जाऊन तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच धान्याचे वाटप करत असते.
गाईंच्या पालनपोषणासाठी आर्थिक मदत करणे हे गोसेवा या योजनेचा एक भाग आहे. भाईंदर येथील उत्तनमधल्या केशवसृष्टी गोशाळेला संस्थेकडून ११ लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे, तसेच नोंदणीकृत असलेल्या गोशाळांना गरजेनुसार दर वर्षी ११ ते २५ हजार रुपयांची देणगी दिली जाते. गाईंच्या उपचारातील औषधांचा खर्च संस्थेकडून केला जात असतो.
या शिवाय दर वर्षी सांस्कृतिक कार्याचा भाग म्हणून दोन कविसंमेलनांचे आयोजन करण्यात येत असते. एक कविसंमलेन मुख्य संस्थेकडून करण्यात येते आणि एक कविसंमेलन स्थानिक पातळीवर क्षेत्रीय समितीकडून करण्यात येते. कविसंमेलनांच्या आयोजनामुळे संस्था चांगलीच नावारूपाला आली. संस्थेने सध्या मीरा-भाईंदरमध्ये एक पाणपोईदेखील चालवायला घेतली आहे. भाईंदर पश्चिम येथील बालाजी नगर भागातील महानगरपालिकेच्या पाणपोईची संपूर्ण देखभाल ‘परोपकार’कडून केली जाते.
याव्यतिरिक्त संस्थेने कारगिल युद्धासाठी लालकृष्ण अडवाणी यांना साडेसात लाख रुपयांचा निधी सुपूर्द केला होता, तसेच सुनामीच्या मदतकार्यालयाही तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याकडे ११ लाख रुपयांची देणगी दिली होती. भुज येथील भूकंपात छात्रावास उभारणीसाठी १२ लाख, बिहारमधील आपद्ग्रस्तांसाठी २१ घरे बांधून देणे, जम्मू-काश्मीर पुराच्या वेळी मुख्यमंत्र्यांकडे २१ लाख रुपये, मुख्यमंत्री निधीसाठी ११ लाख रुपये, उत्तराखंड येथील आपत्तीत उत्तर काशी येथे महाविद्यालय उभारणीसाठी दोन कोटींची मदत आदी भरीव मदतकार्य संस्थेने केले आहे.
संस्थेच्या स्थापनेच्या वेळी तापडीया इंडस्ट्रीजचे मालक जगदीश तापडिया हे संस्थेचे अध्यक्ष होते. सध्या शंकर केजरीवाल हे अध्यक्षपद भूषवत आहेत. मुंबईतील काळबादेवी येथे संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. भाईंदर क्षेत्रीय समितीचे अध्यक्ष मदन भूतडा असून ओमप्रकाश गाडोदिया हे संयोजक आहेत. याशिवाय डॉ. निरंजन अगरवाल, डॉ. सुशील अगरवाल, डॉ. लीला अगरवाल, बाबुलाल तोष्णिवाल, नटवर डागा, इंद्रकुमार सारडा, पन्नालाल राठी हे विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे. भाईंदर क्षेत्रीय समितीचे सध्या ११० सदस्य आहेत.
विवाहासाठी मदत
कन्या विवाह हा महत्त्वाचा उपक्रम संस्था पार पडत असते. ज्या कुटुंबांना लग्नाचा खर्च झेपत नाही अशा कुटुंबांना ‘परोपकार’कडून ११ ते २१ हजार रुपयांची मदत केली जाते, तसेच ज्यांना हा खर्च करणे अजिबात शक्य नाही अशा जोडप्याला मंगळसूत्र, भांडीकुंडी घेण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत मदत केली जाते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी परदेश यात्रा
२००८ पासून संस्थेने एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी आध्यात्मिक परदेश यात्रा. ज्या वरिष्ठ नागरिकांना कोणाचाही आधार नाही, ज्यांचे नातेवाईक त्यांना विचारत नाहीत, अशा ज्येष्ठ नागरिकांना संस्थेकडून परदेश यात्रेवर नेण्यात येते आणि या यात्रेदरम्यान विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.