किशोर कोकणे
तीन-चार वर्षांपूर्वी बांधलेली भिंत खचू लागल्यामुळे दुर्घटनेची भीती
पारसिक बोगद्यालगत कळव्याच्या दिशेला तीन-चार वर्षांपूर्वी बांधलेली संरक्षण भिंत खचून रेल्वे रुळांच्या दिशेने झुकू लागली आहे. भिंतीला अनेक ठिकाणी तडेही गेले आहेत. रेल्वे प्रशासनाने भिंतीची डागडुजी वेळीच न केल्यास गंभीर दुर्घटना ओढविण्याची भीती व्यक्त होत आहे.
मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या पारसिक बोगद्याच्या परिसरात आसपासच्या वस्त्यांमधून दररोज मोठय़ा प्रमाणावर कचरा टाकला जातो. मध्यंतरी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन हा कचरा हटवण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली होती. स्थानिक प्राधिकरणांकडून सातत्याने ओरड सुरू झाल्याने रेल्वे प्रशासनाने महापालिकेच्या सल्ल्यानुसार तीन ते चार वर्षांपूर्वी बोगद्यालगत संरक्षक भिंत उभारली. कळव्याच्या दिशेला असलेल्या या संरक्षण भिंतीला तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी भगदाडे पडली आहेत. भिंतीचा काही भाग रेल्वे रुळांच्या दिशेने झुकू लागला आहे. ज्या मातीच्या आधारावर ही भिंत उभी आहे ती सरकू लागली आहे. पावसाळ्यात यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
बोगद्याच्या मुंब्य्राच्या दिशेला असलेला संरक्षण भिंतीचा काही भाग सुमारे अडीच वर्षांपूर्वी रेल्वे रुळांच्या दिशेला पडला होता. कोणतीही दुर्घटना झाली नसली, तरी तो राडारोडा हटवून मार्ग खुला करण्यासाठी रेल्वे वाहतूक काही तास बंद करण्यात आली होती. हजारो प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागला होता. कळव्याच्या दिशेला असलेली संरक्षण भिंत ही मुंब्रा येथे पडलेल्या भिंतीच्या तुलनेत काही पट मोठी आहे. त्यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता आहे.
संरक्षण भिंत जर धोकादायक झाली असेल तर संबंधित विभागाला त्याची माहिती देण्यात येईल आणि भिंत दुरुस्त करण्यात येईल.
– ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेने ठोस पावले उचललेली नाहीत. दररोज रूळ ओलांडताना अनेकांना जीव गमावावा लागतो. त्यात ही नवी आपत्ती ओढविण्याची भीती आहे.
– सिद्धार्थ पिंगळे, प्रवासी
पारसिक बोगद्यालगत बांधलेली संरक्षक भिंत रुळांच्या दिशेने झुकली आहे. भिंतीत भगदाडेही पडली आहेत.