उल्हासनगरः एका इमारतीचा काही भाग शेजारच्या घरावर कोसळल्याने एक महिला जखमी होऊन घराचे नुकसान झाले आहे. उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागात पार्वती प्लाझा या इमारतीच्या घराच्या गॅलरीचा काही भाग कोसळला. यावेळी शेजारच्या घराचे पत्रे फुटले. इमारत धोकादायक असल्याने यापूर्वीच पालिका प्रशासनाने या इमारतीला नोटीस दिली होती. मात्र स्थानिक रहिवाशांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

उल्हासनगर कॅम्प नंबर तीन भागातील महाराजा हॉल परिसरात पार्वती प्लाझा ही इमारत आहे. चार मजली असलेल्या या वाणिज्य इमारतीला गेल्या वर्षात जून महिन्यात महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केले होते. मात्र त्यानंतरही येथील व्यापाऱ्यांनी संरचनात्मक लेखापरिक्षण केले नाही. तसेच इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले असतानाही ही इमारत रिकामी करण्यात आली नव्हती. या इमारतीच्या शेजारी बैठी चाळी होती. त्यामुळे इमारत कोसळल्यास जिवितहानी होण्याचा धोका होता. मात्र इमारतीचा वापर करणाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.

रविवारी सायंकाळी या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा प्लास्टरचा काही भाग पडला. हा भाग शेजारी असलेल्या बैठ्या घरावर पडला. त्यामुळे या घराचे पत्रे फुटून घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातावेळी या घरात कुणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र त्याचवेळी या घराजवळ काम करणाऱ्या एका महिलेला याचा फटका बसला. त्यामुळे त्या जखमी झाल्या. या अपघातानंतर धोकादायक इमारतीवर कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत. तर महापालिका प्रशासनाने या इमारतीला नोटीस बजावली होती. धोकादायक ठरल्याने या इमारतीला रिकामी करून तीचे संरचनात्मक लेखापरिक्षण करण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती उलहासनगर महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे. या अपघाताच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने या इमारतीचा वीज आणि पाणी पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महापालिकाच ही इमारत रिकामी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.