लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील काटई गावातील मराठी शाळेजवळ कल्याण डोंबिवली पालिकेच्या अमृत योजनेतून जलकुंभ उभारणीचे काम सुरू आहे. मंगळवारी सकाळी जलकुंभाच्या कठड्याचा स्लॅबचा काही भाग कोसळला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
या जलकुंभाच्या परिसरात चार ते पाच घरे आहेत. रहिवाशांचा वावर या भागात असतो. कल्याण डोंबिवली पालिकेकडून मागील दोन वर्षापासून २७ गावांना मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी ३९६ कोटी शासन निधीतून अमृत योजना राबविली जात आहे. या योजनेतून जलवाहिन्या वितरण, १२ जलकुंभ २७ गाव भागात उभारण्यात येणार आहेत.
काटई गावातील मराठी शाळेजवळ जलकुंभ उभारणीचे काम सुरू आहे. या जलकुंभाचे खांब उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. टाकीचे काम ठेकेदाराकडून सुरू आहे. टाकीच्या कठड्याचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. या कामासाठी लोखंडी जाळ्या विणण्यात आल्या होत्या. या जाळ्यांमध्ये सिमेंटचा गिलावा टाकण्यात आल्यानंतर काही वेळाने गिलावा जमिनीवर पडला. परिसरातील रहिवासी मोठ्याने आवाजाने धावत आल्याने त्यांना स्लॅब कोसळल्याचे समजले.
आणखी वाचा- डोंबिवलीत सागावमध्ये नवजात मृत अर्भक सापडले
स्थानिक रहिवाशांनी ठेकेदाराला फैलावर घेतले. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने हा प्रकार घडला. याठिकाणी काही दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी पालिकेने घेतली असती का, असे प्रश्न रहिवाशांनी केले. पालिकेतील एका मातब्बर नगरसेवकाच्या आशीर्वादाने ठेकेदार ही कामे करत असल्याचे काटई ग्रामस्थांनी सांगितले.
“टाकीच्या कठड्याचे काम सुरू आहे. तेथे स्लॅब टाकण्यासाठी विणलेली लोखंडी जाळ्यांची गुंफण सैल झाली. त्यामुळे लोखंडी जाळीतील सिमेंटचा गिलावा खाली पडला. जलकुंभाचे काम उत्कृष्ट पध्दतीने सुरू आहे.” -शैलेश कुलकर्णी, अभियंता, अमृत योजना