कल्याण पूर्वेतील उध्दव ठाकरे समर्थक शिवसेनेचे उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर बुधवारी सकाळी झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जखमी पालांडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना धीर देत ‘सध्या तब्येतीची काळजी घ्या. आपण नंतर घडल्या घटनेचा वचपा काढूच. मी कल्याणला येणार आहे. त्यावेळी पाहू’ असा इशारा हल्लेखोरांना दिला.
शिंदे समर्थक गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या समर्थकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा पालांडे यांनी आरोप केला आहे. तर हे आरोप नगरसेवक गायकवाड यांनी फेटाळले आहेत. या आरोपामुळे कल्याणमध्ये शिंदे आणि ठाकरे गटात वादाची ठिणगी पडली असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
पोलीस बंदोबस्तात फिरणारे हल्ले करू लागले तर सामान्य शिवसैनिकांनी न्याय मागायचा कुणाकडे, अशी प्रतिक्रिया कल्याण शिवसेना शहरप्रमुख सचिन बासरे यांनी दिली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी प्राथमिक अहवाल दाखल करून घेण्यास विलंब केल्याने ठाकरे समर्थक शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पोलिसांवर वरून दबाव असल्यानेच ते आरोपींची बाजू घेत आहेत, असे पालांडे यांनी सांगितले.