किशोर कोकणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या आणि पर्यावरणदृष्टय़ा अत्यंत संवेदनशील असलेल्या येऊर परिसरात रात्रीच्या वेळी होणारा धांगडिधगा अद्याप थांबलेला नाही. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या आठवडय़ात काढलेले आदेशही प्रशासकीय यंत्रणांच्या नाकार्तेपणामुळे धाब्यावर बसवले गेल्याचे चित्र आहे.

येऊरच्या वनराईत रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या पाटर्य़ा आणि समारंभांना आळा बसावा यासाठी रात्री ११ नंतर प्रवेशद्वार बंद करण्याचे आदेश वनमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात त्याआधीच येऊर गाठून रात्री उशीरापर्यंत पार्टी बहाद्दरांनी नियम मोडलेच शिवाय परतीच्या वाटेवर प्रवेशद्वारावर पहाऱ्यासाठी उभे असलेल्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करत प्रवेशद्वार उघडायला लावले. वन कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने पोलिसांनीही येथे पहारा द्यावा, हा वनमंत्र्यांनी दिलेला आदेशही स्थानिक पोलिसांनी पाळला नसल्याचे दिसले. यासंदर्भात पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांना संपर्क साधला असता, माहिती घेऊन कळवितो असे त्यांना सांगितले. वनमंत्र्यांच्या आदेशानंतरही ठाणे महापालिका बेकायदा हॉटेलवर कारवाई करत नसल्याचे चित्र आहे.  १५-२० दिवसांपूर्वी एका हॉटेलचा काही भाग तोडण्यात आला. मात्र हॉटेल ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचे असल्याने राजकीय सूडापोटी कारवाई झाल्याचा आरोप झाला. त्यानंतर महापालिकेने एकाही हॉटेलवर कारवाई केलेली नाही. 

तक्रारी काय?

१०-१२ वर्षांपासून येऊरमध्ये मोठय़ा प्रमाणात बेकायदा हॉटेल उभारण्यात आली. तेथे रात्रभर पाटर्य़ा रंगतात. त्यामुळे पूर्वी आढळून येणारे अनेक प्राणी-पक्षी गायब झाल्याचे या परिसरात राहणाऱ्या आदिवासींचे म्हणणे आहे. प्रखर विद्युत झोतांचा आदिवासी वस्त्यांना त्रास सहन करावा लागतो. बहुतांश हॉटेल मालकांकडे अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्रही नाही. एखादी आगीची दुर्घटना झाली आणि आग जंगलामध्ये पसरली तर वनसंपदेच्या हानीस जबाबदार कोण, असा प्रश्न पर्यावरणवादी विचारत आहेत.