लोकसत्ता खास प्रतिनिधी
ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेशाची मालिका सुरूच आहे. सोमवारी रात्री ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या दोन महिला नगरसेविका तर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखाप्रमुखाने पक्ष प्रवेश केला. या निमित्ताने शिंदेच्या सेनेने राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला धक्का दिला आहे.
शिवसेनेत वर्षभरापूर्वी बंड झाले. या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेवर आले. केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देऊ केले. गेल्या काही महिन्यांपासून शिंदे यांच्या सेनेत पक्ष प्रवेशाची मालिका सुरू झाली असून यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विक्रोळी टागोर नगर विभागाचे शाखाप्रमुख राजेश सोनवळे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या धारावी येथील माजी नगरसेविका रेश्मा बानो वकील शेख आणि जोगेश्वरी येथील माजी नगरसेविका नाजिया सोफिया यांनीही कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक तसेच राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच राज्य शासनाच्या वतीने आपल्या प्रभागातील सर्व प्रलंबित प्रश्न नक्की मार्गी लावण्यात येतील असा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार मनीषा कायंदे, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, शिवसेना उपनेत्या कला शिंदे हेदेखील उपस्थित होते.