डोंबिवली शहर हे मध्यमवर्गीयांचे मानले जाते. कुणाच्याही अध्यात-मध्यात नसणारा हा वर्ग आपापले काम चोखपणे करीत असतो. डोंबिवलीत अशा कुटुंबांची बहुसंख्या असणाऱ्या अनेक वसाहती आहेत. पूर्व विभागातील पार्वती सहनिवास हाऊसिंग सोसायटी त्यापैकीच एक. अगदी स्थापनेपासून गेली २४ वर्षे एकच कार्यकारिणी मंडळ या सोसायटीचा कारभार पाहत आहे. एखादी सोसायटी आपल्या सोसायटीचा कारभार कॉपरेरेट कार्यालय किंवा बँकेसारखा करू शकते, हेही या सोसायटीने दैनंदिन कारभाराचा चोख ताळेबंद ठेवून दाखवून दिले आहे.

पार्वती सहनिवास हाऊसिंग सोसायटी, सावरकर रस्ता, डोंबिवली पूर्व

सावरकर रस्त्यावर १९५१ च्या दरम्यान त्र्यंबक विनायक गोखले यांचे टुमदार घर होते. घराभोवती ऐसपैस जागा, समोर अंगण, तुळशी वृंदावन, आवारात फळ, फूल झाडे, असे कोकणातल्या घरासारखे वातावरण. घराच्या प्रशस्त एका भागात दोन गोखलेबंधू आणि उर्वरित भागात यशवंत डोंगरे व इतर दोन भाडेकरू राहत होते. असे आटोपशीर कुटुंब या घरात राहत होते. नियमितचे सण, उत्सव मालक, भाडेकरू एकत्रित पद्धतीने साजरे करीत. घराभोवती अंगण होते.
हळूहळू डोंबिवली वाढू लागली होती. वाडे, बंगल्यांच्या जागी इमारती उभारण्यास सुरुवात झाली होती. विस्तारणाऱ्या कुटुंबाची गरज आणि बाहेरील जगाशी असलेल्या स्पर्धेबरोबर चालण्यासाठी गोखले कुटुंबीयांनी १९९० मध्ये आपल्या घराच्या ठिकाणी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. अशा वेळी मालक भाडेकरूंना घर सोडून देण्याचे फर्मान सोडतो. असे प्रकार अलीकडे खूप वाढले आहेत. पण, गोखले कुटुंबीयांनी आपल्या वर्षांनुवर्षांच्या भाडेकरूंना वाऱ्यावर न सोडता, त्यांनाही इमारत विकासात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला.
तीस ते चाळीस वर्षांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी गट तयार करून सरकारकडून डोंबिवलीतील काही भूखंड त्या वेळच्या नाममात्र दराने ताब्यात घेतले. त्यावर इमारती बांधून सोसायटय़ा स्थापन केल्या. अशाच पद्धतीची गोखले कुटुंबीयांच्या घराची जमीन होती. मध्यमवर्गीय सरकारी नोकरांनी सरकारी भूखंडावर उभारलेली सोसायटी म्हणून ‘मिडल क्लास गव्हर्नमेंट सर्व्हट सोसायटी’चे भूखंड म्हणून या जमिनी ओळखल्या जातात. नेहरू मैदानाचा अलीकडचा कोपरा ते सावरकर रस्त्यादरम्यानच्या मधल्या भागात ‘मिडल क्लास सोसायटी’चे एकूण ६१ भूखंड (प्लॉट) आहेत. त्यामधील एका भूखंडावर ‘पार्वती सहनिवास’ सोसायटी उभी आहे. सोसायटीच्या भूखंडाचा काही भाग सामाजिक भावनेतून नाममात्र दराने या भागातील एका शाळेला उपलब्ध करून देण्यात आला आहे. गोखले यांचे घर इमारत उभारणीच्या कामासाठी तोडण्यात आल्यानंतर नामवंत विकासक, वास्तुविशारद या कामासाठी निवडण्यात आले. विकासक अनिल जोशी हे सचोटीने व काटेकोरपणे काम करण्यात अग्रेसर होते. वास्तुविशारद अरुण भगत यांनी केलेल्या वास्तुरचनेला तोड नव्हती. ‘पार्वती सहनिवास’च्या बांधकामापासून ते वास्तुरचनेचे काम जोशी, भगत यांना देण्यात आले.
सरकारी, पालिकेच्या परवानग्या घेऊन एक वर्षांत आखीव-रेखीव धाटणीची तीन मजली इमारत उभी राहिली. त्या जमिनीचे मूळ मालक गोखले कुटुंबीय होते. त्यामुळे नव्याने उभ्या राहणाऱ्या इमारतीत नवीन सदनिकांची रचना व तिचे वितरण कसे करायचे याचे सर्वाधिकार गोखले यांना होते. अलीकडे मालक आणि भाडेकरू म्हणजे दोन टोकाची अंतरे समजली जातात. सामंजस्य हा प्रकार या दोन्ही वर्गात अलीकडे दिसून येत नाही. मात्र गोखले कुटुंबीयांनी भाडेकरू हा आपला वर्षांनुवर्षांचा सोबती आहे. एक कुटुंब म्हणून आपण भाडेकरूसोबत राहिलो आहोत. त्यामुळे नवीन वास्तूत भाडेकरूंनाही कोणतेही आढेवेढे न घेता तितक्याच आपुलकीने निवासासाठी सदनिका उपलब्ध करून दिली.
इमारत बांधून पूर्ण झाल्यावर एकूण दहा सदनिका राहण्यासाठी उपलब्ध झाल्या होत्या. पाच सदनिका दिलीप व विजय गोखले हे दोन बंधू आणि उर्वरित तीन भाडेकरू यांच्यासाठी निश्चित होत्या. गोखले यांच्या काही मित्रपरिवाराला इमारतीची रेखीव-आखीव उभारणी, प्रशस्त खेळत्या हवेतील सदनिका खूप आवडल्या. काही मंडळींनी आपली स्वमालकीची अन्य ठिकाणची घरे विकून गोखले यांच्या इमारतीत भाडय़ाने येऊन राहणे पसंत केले. काहींनी मालकी हक्काने सदनिका ताब्यात घेतल्या. या इमारतीचे वैशिष्टय़ हे की इमारतीला पूर्व आणि पश्चिम बाजूने चोवीस खेळती हवा राहील, अशी रचना करण्यात आली आहे. प्रशस्त, ऐसपैस मोकळी हवा खेळवणाऱ्या खिडक्या. तळापासून ते वरच्या मजल्यापर्यंत कितीही येरझऱ्या मारल्या तरी, दम लागणार नाही, अशा पद्धतीचे जिने. इमारतीच्या चोहोबाजूंनी मोकळी जागा. दर्शनी भागात प्रशस्त अंगणासारखा भाग आहे. सीमेंटच्या जंगलातून हद्दपार झालेले आणि फक्त पुस्तकात दिसणारे देखणे तुळशी वृंदावन ‘पार्वती सहनिवास’च्या दर्शनी भागात दर्शन देते. इमारतीच्या चारही बाजूने तगर, गुलमोहोर, फणस, नारळ, अशोकाची झाडे मातीच्या आळ्यांमध्ये उभी आहेत. झाडांच्या भोवती पाणी राहावे म्हणून त्यांना सलग सीमेंटची लहान भिंत बांधण्यात आली आहे. पडलेला झाडांचा पाला पुन्हा या झाडांच्या भोवती खत म्हणून टाकला जातो. सुरुवातीला इमारतीत कोणाकडे दुचाकी नव्हती, पण दूरदृष्टीचा विचार करून इमारतीच्या एका कोपऱ्याला बंदिस्त दुचाकी वाहनतळ बांधून ठेवण्यात आले. आता त्याचा रहिवासी वापर करीत आहेत. चारचाकी वाहने उभी करण्यासाठी मुबलक जागा आहे. पाणी कपात असली तरी पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचे वाटप केले जाते. तळमजल्याला देखणी टपालपेटी, नामफलक, ढकलते लोखंडी मुख्य प्रवेशद्वार व बंदिस्त सोसायटीचे प्रवेशद्वार सोसायटीतील कडक शिस्तीची जाणीव करून देतात. सोसायटीतील तिन्ही माळ्यांचे जिन्यांलगतेच चकचकीत कोपरे, नियमित झाडलोट करण्यात येत असल्याची जाणीव करून देतात.
सोसायटीत कोणाच्या घरात कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असला की अख्खी सोसायटी घर म्हणून त्या कार्यक्रमात सहभागी होते. तुळशीचे लग्न हा सोसायटीतील फार मोठा सोहळा असतो. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेली मंडळीही या वेळी आवर्जून उपस्थित असतात. अनेक आजोबा आजीबाई आपल्या नातवांना घेऊन तुळशीच्या लग्नाला हजर असतात. याशिवाय अनेक धार्मिक कार्यक्रम सोसायटीत एकत्रितपणे पार पाडले जातात. सोसायटीतील कार्यक्रम म्हटला, की नितीन डोंगरे, वास्तुविशारद दिलीप ऊर्फ अप्पा गुप्ते, अर्थसाक्षरता व गुंतवणूक मार्गदर्शक विजय गोखले ही हरहुन्नरी मंडळी यजमानासारखी कार्यक्रम पार पडेपर्यंत धावपळ करीत असतात.
शासनाने तिढा सोडवावा
सोसायटी नोंदणीकृत करून घेण्यात आली आहे. मिडल क्लास सोसायटीचा भूखंड म्हणून काही शासकीय अडथळे या जमिनीच्या नियमितीकरणात आहेत. ते शासनाने दूर करावेत म्हणून पार्वती सहनिवास सोसायटीचे अध्यक्ष पद्माकर रानडे, सचिव दिलीप गोखले, कोषाध्यक्ष नितीन डोंगरे, तसेच, दिलीप गुप्ते, विजय गोखले ही मंडळी सतत प्रयत्नशील असतात. नियमितीकरणाचा मार्ग मोकळा झाला तर सोसायटीचे रखडलेले ‘मानीव अभिहस्तांतरण’ (कन्व्हेअन्स डीड) सुलभ होईल, असे सोसायटी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मिडल क्लास सोसायटी म्हणून नोंदणीकृत झालेली ही पहिली सोसायटी आहे. मिडल क्लास गव्हर्नमेंट सर्व्हट्स सोसायटी या मुख्य संस्थेची संलग्न (अपेक्स) संस्था म्हणून नोंदणीकृत झालेली पार्वती सहनिवास सोसायटी ही पहिली गृहनिर्माण संस्था आहे. शासनाने अशा प्रकारच्या अनेक सोसायटय़ांच्या मार्गातील नजराणा, दंड रकमेचे अडथळे दूर केले तर या सोसायटय़ांमधील रहिवासी आणखी समाधानाने राहू शकतील, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पार्वती सहनिवास सोसायटी स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून सोसायटीच्या देखभालीसाठी नियमित देखभाल खर्च सदस्यांकडून वसूल केला जातो. वेळोवेळी या देखभाल खर्चात वाढ करून सोसायटीची तिजोरी समतल राहील याची काळजी घेतली आहे. दूरदृष्टीचा विचार करून पंचवीस वर्षांपूर्वी काही चांगले आर्थिक निर्णय घेतल्यामुळे सोसायटीच्या तिजोरीत पुरेसा निधी उपलब्ध आहे. या निधीतून सोसायटीच्या बाह्य़ दुरुस्ती, देखभाल व नूतनीकरणाची लाखो रुपयांची कामे अलीकडे करण्यात आली आहेत. चोवीस वर्षांपूर्वीची इमारत, पण आता रंगरंगोटी केल्यामुळे साजशृंगार केलेल्या नववधू सारखी वाटत आहे. आणखी चाळीस वर्षे सोसायटी टवटवीत राहील, असा विश्वास सदस्य व्यक्त करतात. सोसायटीत ज्येष्ठ नागरिक मंडळी घरात, मुले, सुना नोकरीला असे वातावरण असते. एखादे कुटुंब बाहेरगावी चालले म्हणून घरावर लक्ष कोण ठेवील, हा विचार येथे शिवत नाही. सोसायटीत कोण आले, कोण गेले यावर रहिवासांची अहोरात्र नजर असते. ‘एकजीव, एकत्र कुटुंब पद्धतीत राहणाऱ्यांमध्ये नीतिमत्ता असेल तर तेथे सुख, समाधान आणि समृद्धी लाभते. मागच्या पंचवीस वर्षांत हाच अनुभव आम्ही पार्वती सहनिवासात घेतोय,’ असे पद्माकर रानडे यांनी सांगितले. घरातील समाधानाचे सुख प्रत्येक रहिवासी घेतोय. मोक्याच्या ठिकाणी जागा आहे, म्हणून लगेच तिचे गगनचुंबी संकुल करा, अशी एकाही सदस्याची इच्छा नाही. आमच्या पुढच्या पिढय़ाही कधी घरपण सोडून पार्वती सहनिवासाची व्यापारी गगनचुंबी इमारत उभारण्याच्या भानगडीत पडणार नाहीत, असा विश्वास सदस्यांना आहे.

Story img Loader