डोंबिवली – भाडे देण्याच्या वादातून रविवारी रात्री येथील एमआयडीसीतील विको नाका भागात एका ओला कार चालकाला एका प्रवाशाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. सुनीलकुमार राजदेव यादेव (४५) असे ओला कार चालकाचे नाव आहे. तो दावडी गावात राहतो. रफिक शेख असे प्रवाशाचे नाव आहे. तो सोनारपाडा भागात राहतो.
पोलिसांनी सांंगितले, सुनीलकुमार प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला कंपनीत चालक म्हणून काम करतात. रविवारी रात्री पावणेबारा वाजता प्रवासी रफिक शेख यांनी ऑनलाईन माध्यमातून सुनीलकुमार यांची कार प्रवासासाठी नोंदणीकृत केली. वाशी, नवी मुंबई, वाशी बाजार समिती ते सोनारपाडा असा प्रवासाचा मार्ग होता.
हेही वाचा – मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
विहित वेळेत ओला कार चालकाने प्रवासी रफिक यांना डोंबिवली एमआयडीसीतील विको नाका भागात सोडले. प्रवास संपल्यानंतर भाड्याचा विषय आला. त्यावेळी प्रवासी रफिक यांनी चालकाबरोबर वाद घातला. या वादातून रफिकने हातमधील टणक वस्तूचा फटका चालक सुनीलकुमार यांच्या चेहऱ्यावर मारला. या मारहाणीत ते जखमी झाले. घडल्या घटनेची चालक सुनीलकुमार यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस उपनिरीक्षक के. पी. गांगुर्डे तपास करत आहेत.