लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानकातील आरक्षित तिकीट खिडकीवर रेल्वे तिकीट दलालांना न विचारता स्वताहून तिकीट काढण्यासाठी उभ्या असलेल्या एका प्रवाशाला रेल्वे तिकीट दलालांनी संगनमत करुन मारहाण केली. या प्रकारामुळे रेल्वे आरक्षित खिडक्यांना दलालांचा विळखा असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला.

कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठीची आरक्षणाची तिकिटे तात्काळ आरक्षित झाल्याने दोन दिवसांपासून गोंधळ उडाला आहे. अशा परिस्थितीत कल्याण रेल्वे स्थानकात दलालांनी प्रवाशाला मारहाण केल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

हेही वाचा… कल्याण रेल्वे स्थानकात २४ तासांत ११ मोबाईलची चोरी, सातजण अटकेत

संतोष राय असे मारहाण झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. ते आपल्या कुटुंबीयांसह उत्तर प्रदेशातील बनारस येथे जाण्यासाठी मेल एक्सप्रेसचे आरक्षित तिकीट मिळविण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकातील आरक्षित तिकीट खिडकीवर प्रयत्न करत होते. एक दिवस त्यांचा क्रमांक ५० होता. दुसऱ्या दिवशी ११ वा आला. तरी त्यांना आरक्षित तिकीट मिळाले नाही. एक प्रवासी आपल्यात नाहक लुडबुड करतो म्हणून आरक्षित तिकीट खिडकीभोवती विळखा टाकून बसलेल्या दलालांना राग आला होता.

हेही वाचा… मानव कल्याण केंद्राचे संस्थापक डॉ. मूलचंद छेडा यांचे निधन

संतोष काल रात्री पुन्हा आरक्षित तिकीट खिडकीबाहेर तिकिटासाठी उभे होते. त्यावेळी दलालांनी त्यांना रांगेतून बाहेर काढून स्वताची माणसे घुसविण्यास सुरुवात केला. संतोष यांनी त्यास विरोध करुन या प्रकराचे मोबाईलमधून दृश्यचित्रिकरण सुरू केले. संतोष यांनी दलालांच्या मनमानीला आणि दृश्यचित्रिकरण मोबाईल मधून काढण्यास नकार दिल्याने दलालांनी त्यांना मारहाण केली. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही मध्ये हा प्रकार कैद झाला आहे.

हेही वाचा… कल्याण पूर्वेतील नेवाळी, आडिवलीमधील बेकायदा इमारती जमीनदोस्त

रेल्वे स्थानकातील आरक्षित खिडक्यांजवळ दलालांचा विळखा पडला असताना रेल्वे सुरक्षा दलाचे जवान करतात काय असे प्रश्न नागरिक करत आहेत. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मुकेश ढगे या प्रकरणाचा तपास करत आहे. रेल्वे सुरक्षा बळाचे राकेश कुमार शर्मा यांनी आरक्षण केंद्राभोवती दलालांचा विळखा नसल्याचे सांगितले. दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे ढगे म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passenger beaten by ticket brokers at kalyan railway station dvr