बदलापूर रेल्वे स्थानकावर सध्या रेल्वे प्रवाशांना अरुंद पादचारी पुलाचा जाच होत असून यासाठी पुलाला पर्याय म्हणून पादचारी रेल्वे रुळावर उडय़ा मारून पूर्वेकडे जात आहेत. मुंबई व पुण्याकडून येणाऱ्या द्रुतगती गाडय़ांच्या मार्गातून हे प्रवासी जात असल्याने मोठय़ा अपघाताची भीती निर्माण झाली आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकावरील अरुंद पादचारी पुलाचा जिना ही रेल्वे प्रवाशांसाठी समस्या झाली असून या जिन्यावर चढण्यासाठी प्रवाशांना १०-१५ मिनिटे थांबावे लागत आहे. त्यामुळे नोकरीवरून दमून आल्यावर इतका वेळ थांबण्याऐवजी प्रवासी थेट प्लॅटफॉर्मवरून खाली उडय़ा मारून रूळ ओलांडत आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक १ व २ वर असलेल्या पादचारी पुलाचा जिना हा अरुंद असून या पुलावर दोन्ही बाजूने प्रवासी आल्यास कोणत्या तरी एका बाजूच्या प्रवाशांचा १० मिनिटे तरी खोळंबा होतो. यासाठी फलाट क्रमांक १ समोरील भिंत काहींनी पाडून त्याला भगदाड पाडले आहे. या भगदाडातून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडावा लागत आहे. हा अरुंद जिना लवकरच मोठा करावा, अशी मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत.
दुभाजक काढले अन्..
प्रवाशांनी रूळ ओलांडू नये यासाठी रेल्वेने रुळांमध्ये अंबरनाथ दिशेने लोखंडी दुभाजक टाकले खरे, परंतु प्रवासी त्याच्या पुढून येऊ लागले. या दुभाजकाखाली असलेल्या गटाराच्या सफाईसाठी हे दुभाजक तात्पुरते काढण्यात आल्याचे स्थानक प्रबंधक पी. के. लाल यांनी सांगितले. हे दुभाजक दोन दिवसांपूर्वी काढल्याने प्रवासी मोठय़ा प्रमाणावर रेल्वे रुळांवर उडय़ा मारू लागले आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बदलापूर स्थानकात प्रवाशांना अरुंद पुलाचा जाच
बदलापूर रेल्वे स्थानकावर सध्या रेल्वे प्रवाशांना अरुंद पादचारी पुलाचा जाच होत असून यासाठी पुलाला पर्याय म्हणून पादचारी रेल्वे रुळावर उडय़ा मारून पूर्वेकडे जात आहेत.
First published on: 08-07-2015 at 12:21 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passenger facing problem of narrow pedestrian bridge at badlapur railway station