कल्याण – कल्याण ते कोल्हापूर या प्रवासासाठी कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा सोन्याचा दोन लाख ७५ हजार रूपयांचा ऐवज बसमधून चोरीला गेला आहे. प्रवासात ही चोरी झाल्याने बसमधील कोणा इसमानेच ही चोरी केली असण्याचा संशय तक्रारदाराला आहे. गेल्या गुरुवार, शुक्रवारच्या कालावधीत बस प्रवासात हा प्रकार घडला आहे. प्रवीणकुमार मनोहर थोरात (४३) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते मूळचे कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. ते नोकरीनिमित्त कल्याण मधील रामबाग भागात राहतात.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये घटस्फोटीत महिलेची इमारतीच्या गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या

पोलिसांनी सांगितले, प्रवासी प्रवीणकुमार थोरात हे गुरुवारी रात्री नऊ वाजता कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकातील रामदेव हॉटेलमध्ये बसले. ते शुक्रवारी सकाळी ११ वाजता कोल्हापूर येथे उतरले. घरातून निघताना तक्रारदार थोरात यांनी दोन लाख ७५ हजार रूपयांचा ऐवज असलेली सोन्याची पिशवी बंदिस्त करून ती मोठ्या पिशवीमध्ये तळाला इतर कपड्यांच्या मध्ये ठेवली होती. बसमधून प्रवास करायचा असल्याने चोरी होण्याची शक्यता नव्हती. कोल्हापूर येथे शुक्रवारी उतरून थोरात आपल्या घरी गेले. तेथे त्यांनी पिशवीची चाचपणी केली. त्यांना पिशवीत बंदिस्त करून ठेवलेले सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. बसमध्ये ठेवल्या जागीच पिशवी असताना पिशवीतील दागिने गेले कोठे असा प्रश्न निर्माण झाला. बसमधील अज्ञात इसमानेच पाळत ठेऊन ही चोरी केली असण्याचा संशय व्यक्त करून प्रवीणकुमार थोरात यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. हवालदार जितेंद्र चौधरी या प्रकरणाचा तपास करत आहेत.