कल्याण – टिटवाळ्यात गुरुवारी रात्री एका रिक्षा चालकाला एका प्रवाशाने प्रवासी भाड्याची ५० रूपयांची नोट दिली. ही नोट फाटकी आहे. ती बदलून दे, या विषयावरून रिक्षा चालक आणि प्रवाशी यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेवरून टिटवाळ्यातील प्रवाशांनी रिक्षा चालकांच्या मग्रुरीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अंशुमन शाही असे मरण पावलेल्या प्रवाशाचे नाव आहे. राजा भोईर असे आरोपी रिक्षा चालकाचे नाव आहे. मयत शाही हे हरीओम व्हॅली संकुलात कुटुंबीयांसह राहतात. गुरुवारी रात्री कामावरून परतल्यावर त्यांनी टिटवाळा रेल्वे स्थानकात नेहमीप्रमाणे घरी येण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षेतून घराजवळ उतरल्यावर अंशुमन शाही यांनी ५० रूपयांची नोट रिक्षा चालक राजा भोईर याला दिली. राजा यांनी दिलेली नोट फाटकी आहे. आणि ती नोट मला का दिली. नोट बदलून द्या, अशी आक्रमक मागणी केली.
हेही वाचा >>> ठाणे : चोरीचा संशय घेतल्याने नातवाकडून आजीची वरवंट्याने ठेचून हत्या
आपल्याजवळ सुट्टे पैसे नाहीत. त्यामुळे ही नोट घ्या. चालत नसेल तर तर परत घेईन असे सांगुनही राजा भोईर काही ऐकण्यास तयार नव्हता. या फाटलेल्या नोटेवरून प्रवासी अंशुमन आणि रिक्षा चालक राजा भोईर यांच्या रस्त्यावर जोरदार हाणामारी झाली. भोईर यांनी शाही यांना बेदम मारहाण केली. हा प्रकार पाहून पादचारी, गृहसंकुलातील लोक बाहेर आले. हाणामारीनंतर अंशुमन शाही रस्त्यावर बेशुध्दावस्थेत पडले. कुटुंबीय आणि काही पादचाऱ्यांनी अंशुमन यांना तातडीने रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये गरबा पाहण्यासाठी आलेल्या मुलाचा वीज वाहिनीचा धक्का बसून मृत्यू
टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी सांगितले, प्रवासी अंशुमन शाही यांचा मृत्यू रिक्षा चालकाबरोबर झालेल्या भांडणानंतर आलेल्या हदयविकाराच्या धक्क्याने झाला आहे. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरवून आम्ही रिक्षा चालक राजा भोईर याला अटक केली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अशाचप्रकारची मुजोरी कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक भागात वाहनतळ सोडून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांकडून सुरू आहे. आरटीओ, वाहतूक विभाग, पालिका आणि पोलिसांनी या बेशिस्त रिक्षा चालकांविरुध्द जोरदार संयुक्त मोहीम हाती घेण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.