लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक ते फलाट क्रमांक पाचच्या दरम्यान एक पादचारी पूल उभारणीचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून सुरू आहे. या पुलाच्या कामात अडथळा येत असल्याने फलाट क्रमांक पाचवरील दक्षिण बाजूकडील उतार मार्गिका (रॅम्प) सोमवारपासून प्रवाशांसाठी बंद करण्याचा निर्णय मुंबई रेल्वे विकास महामंडळाने घेतला आहे.
या उतार मार्गिकेच्या विरुध्द दिशेला असलेला उत्तर बाजूकडील जिन्याचा वापर प्रवाशांनी करण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे साडे तीन लाखाहून प्रवासी येजा करतात. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या तुलनेत डोंबिवली रेल्वे स्थानकातील सरकते जिने, जिने, स्कायवॉक अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या सहकार्याने फलाट क्रमांक एक ते फलाट क्रमांक पाचच्या दरम्यान पादचारी पूल उभारणीचे काम सुरू केले आहे.
आणखी वाचा-आचारसंहितेमुळे कल्याण डोंबिवली पालिकेतील लोकशाही दिन रद्द
या पुलाच्या मार्गात अडथळा येत असलेले आरक्षित, नियमित तिकीट घर फलाट एकवरील कल्याण बाजुला स्थलांतरित करण्यात आले आहे. आता या पुलाच्या मार्गात फलाट क्रमांक पाचवरील दक्षिण बाजूकडील प्रवासी उतार मार्ग (रॅम्प) अडथळा येत आहे. त्यामुळे हा उतार मार्ग काढण्याचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून सुरू करण्यात येत आहेत. या कामासाठी सोमवारपासून (ता.२१) हा उतार मार्ग प्रवाशांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आणखी वाचा-ठाणे मतदारसंघ भाजपकडे कायम राहिल्याने शिंदे गटात अस्वस्थता
यापूर्वी फलाट क्रमांक पाचवर उतरण्यासाठी प्रवासी सीएसएमटी दिशेकडील उत्तर बाजूकडील जिना आणि दक्षिण बाजूकडील उतार मार्गाचा वापर करत होते. आता उतार मार्ग बंद करण्यात आल्यामुळे जिन्यावरील प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता आहेत. या जिन्यावरील गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी दररोज सकाळ, संध्याकाळ रेल्वे सुरक्षा जवानांनी या भागात तैनात राहण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरून मुंबईला जाणाऱ्या अति जलद लोकल धावतात. त्यामुळे या फलाटावर प्रवाशांची सकाळ, संध्याकाळ सर्वाधिक गर्दी असते.