कल्याण: कल्याण जवळील शहाड रेल्वे स्थानकात फलाट आणि लोकलच्या पायदाना मधील अंतर दीड ते दोन फूट आहे. लोकलमध्ये चढताना प्रवाशांना कसरत करावी लागते. विशेष म्हणजे महिला प्रवाशांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो.
इतर रेल्वे स्थानकांमधील फलाट आणि लोकलच्या पायदाना मधील अंतर रेल्वे मार्गिका सुधारित उन्नत करुन कमी करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहाड रेल्वे स्थानकातील फलाट आणि लोकल पायदाना जवळील अंतर कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. शहाड रेल्वे स्थानकात घाईत लोकल पकडताना प्रवाशांना फलाट खाली आणि लोकलचे पायदान उंच राहत असल्याने अनेक वेळा तोल जाण्याची भीती असते. या अंतरामुळे दररोज महिला, विद्यार्थी लोकलमधून उतरताना किंवा चढताना पडत असतात, असे प्रवाशांनी सांगितले.
शहाड रेल्वे स्थानक हे कल्याण आणि उल्हासनगर शहरांजवळील रेल्वे स्थानक आहे. उल्हासनगर जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ आहे. कसारा, शहापूर भागातील व्यापारी उल्हासनगरमध्ये नियमित सामान खरेदीसाठी येतात. त्यांना शहाड रेल्वे स्थानकात आल्यानंतर भारवाहू सामान लोकलमध्ये चढविताना फलाट आणि लोकलमधील अंतरामुळे कसरत करावी लागते. कल्याण मधील बाजारपेठेत सामान खरेदी केलेला व्यापारी कल्याण मधील गर्दी टाळण्यासाठी शहाड रेल्वे स्थानकात येऊन मग पुढचा प्रवास सुरू करतो. सकाळच्या वेळेत कल्याण मधील अनेक रहिवासी कल्याण रेल्वे स्थानकातील गर्दीत अडकायला नको म्हणून शहाड रेल्वे स्थानकात येऊन इच्छित स्थळीचा प्रवास सुरू करतात. या सर्व प्रवासी, व्यापाऱ्यांना शहाड रेल्वे स्थानकातील फलाट आणि लोकल मधील पायदानाचा त्रास सहन करावा लागतो.
“शहाड रेल्वे स्थानकातील फलाट आणि लोकलचे पायदान यामध्ये दीड ते दोन फुटाचे अंतर आहे. या अंतरामुळे नजरचुकीने, घाईत एखादा प्रवासी फलाटावर लोकल मधून उतरताना पडला तर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अंतर कमी करण्यासाठी लवकर उपाय योजना कराव्यात अशी मागणी मध्य रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली आहे.
-शैलेश राऊत, अध्यक्ष कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटना
“शहाड रेल्वे स्थानकात फलाटाची उंची कमी आणि लोकलचे पायदान उंच आणि त्यामुळे प्रवाशांना होत असलेल्या त्रासाची माहिती वरिष्ठांना देण्यात आली आहे. जसे आदेश येतील त्याप्रमाणे हे काम सुरू केले जाईल.”
-ललित कुमार बांधकाम विभाग, मध्य रेल्वे