ठाणे: महापालिका परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) ताफ्यात प्रवासी संख्येच्या तुलनेत अपुऱ्या बसगाड्या असतानाच, आता वाहकांच्या कमतरतेमुळे शहरातील विविध मार्गावरील बसगाड्या २० ते ३० फेऱ्या रद्द करण्यात येत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक वाहकांना प्रशासकीय कामासाठी जुंपण्यात आले असून यामुळे वाहकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अर्धा ते पाऊण तासाने बसगाड्या उपलब्ध होत असल्याने प्रवाशांना थांब्यांवर बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागत आहे. अनेकजण शेअरिंग रिक्षाचा पर्याय निवडत असल्याने त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. या वृत्तास परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दुजोरा दिला आहे.
ठाणे महापालिकेने परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून शहरात सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. शहरातील विविध मार्गांवर टीएमटीच्या बसगाड्या चालविण्यात येतात. प्रवाशी संख्येच्या तुलनेत मात्र बसगाड्यांची संख्या पुरेशी नाही. यामुळे बसगाड्यांची संख्या वाढविण्यावर परिवहन प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे. आधीच अपुऱ्या बसगाड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत असतानाच, त्यात आता वाहकांच्या कमतरतेमुळे भर पडली आहे.
हेही वाचा… ठाणे : आदिवासींची पायपीट थांबणार, पाड्यांना जोडण्यासाठी रस्त्यांचा प्रस्ताव
परिवहन उपक्रमामध्ये ९५२ वाहक कार्यरत आहेत. त्यामध्ये ६२१ कायमस्वरुपी वाहक आहेत. उर्वरीत कंत्राटी वाहक आहेत. त्यात २०६ पुरुष आणि १२५ महिलांचा समावेश आहे. ठाणे परिवहन कार्यालयातील इतर विभागातील कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांचा कामाचा भार काही कायमस्वरुपी वाहकांवर सोपविण्यात आला आहे. ६२१ पैकी १८० वाहकांना कार्यलयीन कामांचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे वाहकांचा तुटवडा निर्माण होऊन बसफेऱ्या कमी झाल्या आहेत. ज्या मार्गावर दिवसाला १०० ते १२० बस फेऱ्या होतात. त्या मार्गावर दिवसाला २० ते ३० फेऱ्या रद्द होत असून यामुळे दिवसाला १ ते २ लाख रुपये उत्पन्नात घट होत आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
परिवहन विभागामार्फत देण्यात आलेल्या वेळापत्रकात १० ते २० मिनिटाच्या अवधीने बस उपलब्ध होतील, असे नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात हे वेळापत्रक कोलमडून पडले असून प्रवाशांना २५ ते ३० मिनिटे बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागत आहे. बस वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना शेअरिंग रिक्षाने प्रवास करावा लागत असून यामुळे त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. लोकमान्यनगर ते ठाणे स्थानक बस प्रवासाची तिकीट दर १५ रुपये आहे. तर, शेअरिंग रिक्षा चालक एका व्यक्तीमागे २० रुपये दर आकारतात. तर, यशोधननगर ते ठाणे स्थानक बस प्रवास तिकीट दर १३ रुपये आहेत. तर, शेअरिंग रिक्षा चालक एका व्यक्तीमागे २० रुपये दर आकारत आहे.
ठाणे महापालिका परिवहन विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती मिळाली आहे. त्यामुळे सध्या विभागात कर्मचाऱ्यांची संख्या घटली आहे. या जागांवर नव्याने भरती केलेली नसल्यामुळे कायमस्वरुपी वाहकांवर कार्यालयीन कामकाजाचा भार सोपविण्यात आला आहे. याचा परिणाम, बस फेऱ्यांवर झाला आहे. येत्या काळात या विभागात कर्मचाऱ्यांची भरती झाल्यावर पुर्वीप्रमाणे बस फेऱ्यांचे नियोजन होईल, अशी माहिती ठाणे परिवहन उपक्रमातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.