ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकातील अरुंद जिन्यांवर सकाळी आणि सायंकाळी प्रवाशांच्या होणाऱ्या अधिकच्या गर्दीमुळे बहुंताश वेळा चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती होत असते. यामध्ये सर्वाधिक गर्दी ही ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ३ आणि ४ वर मोठ्या प्रमाणात होते. असे असतानाच मागील काही दिवसांपासून येथील सरकते जिने बंद असल्याने स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे दिसून येत आहे. तर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे पोलिसांकडून दररोज गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे मार्गावरील अत्यंत गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. या स्थानकातून नियमित स्वरूपात सहा ते सात लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. या स्थानकातून उपनगरीय रेल्वे गाड्यांसह लांब पल्ल्याच्या गाड्याही मार्गस्थ होतात. तर कर्जत, कसारा, मुंबई तसेच नवी मुंबई आणि पनवेल या स्थानकांमध्ये ठाण्याहून मोठ्या संख्येने लोकल गाड्या जात असतात. याचे सर्वाधिक प्रमाण सकाळी आणि सायंकाळी असते. सकाळी आपल्या कामानिमित्त मुंबईच्या दिशेने तर काही प्रवाशी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने प्रवास करत असतात. यातील फलाट क्रमांक ३ आणि ४ वर प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. यातही मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आणि ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्या फलाटात एकाच वेळी आल्यास मोठी गर्दी होते. अशावेळी सर्व प्रवासी एकाच वेळी स्थानकाबाहेर पडण्यासाठी फलटावरील जिन्यांकडे धाव घेतात. यामुळे प्रवाशांची जिन्यांवर मोठी गर्दी उसळलेली दिसून येते. अशावेळी फलाटावरील सरकत्या जिन्यांमुळे गर्दीचे विभाजन होते. यामुळे स्थनकातील काही अरुंद जिन्यांवरील गर्दीचा ताण कमी होतो.

हेही वाचा… उद्धव ठाकरे व्यंगचित्रातून रावण रूपात; शिवसेनेच्या व्यंगचित्रातून थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मागील काही दिवसांपासून या फलाटांवरील सरकते जिने बंद असल्याने प्रवाशांना जिने चढतेवेळी मोठ्या प्रमाणात गर्दीचा सामना करावा लागत आहे. प्रामुख्याने सकाळच्या वेळी असे चित्र सध्या दिसून येत आहे. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे काही तास पोलिसांना या जिन्याजवळ उभे राहून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करावे लागत आहे. यामुळे संतप्त प्रवाशांकडून सरकत्या जिन्यांची लवकरच दुरुस्ती करून ते सुरू करण्याबाबत मागणी केली जात आहे. याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

पुलाचे कामही रखडले

एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी स्थानकात नव्याने पुलाची उभारणी करण्यात येत आहे. परंतु काही महिन्यांपासून या पुलाचे काम देखील रखडले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers are suffering due to the escalators in thane railway station being closed dvr
Show comments