डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक ते पाचच्या दरम्यान पादचारी पूल उभारणीचे काम सुरू आहे. या कामासाठी फलाटावरील छताच्या काही भागातील निवारे काढण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना फलाटावर आता उन्हाचे चटके सहन करत उभे राहावे लागते. अनेक प्रवासी छत असलेल्या भागात एकाच ठिकाणी उभे राहत असल्याने त्याठिकाणी गर्दी होत आहे.
लोकल आली की मग प्रवासी छत नसलेल्या भागात जाऊन लोकल पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानकातील वाढती प्रवासी गर्दी विचारात घेऊन मध्य रेल्वेने डोंबिवली रेल्वे स्थानकात दोन पादचारी पूल उभारणीचे नियोजन केले आहे. यामधील एका पादचारी पुलाच्या उभारणीचे काम मागील वर्षापासून डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या मधील भागात सुरू आहे. या कामासाठी फलाट क्रमांक एक ते पाचवरील छतावरील पत्रे, आधार खांब हटविण्यात आले आहेत. आरक्षण केंद्रे, तिकिट खिडक्या, जिने हटविण्यात आले आहेत.
पावसाळ्या ही कामे बंद ठेवण्यात आली होती. ऑक्टोबरनंतर या कामांनी पुन्हा वेग घेतला आहे. डोंबिवली रेल्वे स्थानका सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची गर्दी असते. मध्य रेल्वे स्थानकातील गर्दीने गजबजलेले स्थानक म्हणून डोंबिवली रेल्वे स्थानक ओळखले जाते. रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाच्या कामामुळे फलाटावरील आसने काढण्यात आली आहेत. फलाटावरील काही भागात निवारे नाहीत. प्रवाशांना उन्हाचे चटके खात लोकलची वाट पाहत उभे राहावे लागते. पादचारी पूल उभारणीची कामे रात्रं दिवस सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी रेल्वेने ही कामे पूर्ण करावीत, अशी प्रवाशांची मागणी आहे.
मागील दोन महिन्याच्या काळात डोंंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटावरील छतावर पत्रे नसले तरी प्रवासी उन्हाचा चटका नसल्याने मोकळ्या जागेत उभे राहत होते. अलीकडे उन्हाचा चटका, उन्हात उभे राहिल्याने अंगाची तलखी होऊ लागल्याने प्रवाशांना फलाटावर सुरू असलेल्या कामाचे चटके बसू लागले आहेत. महिला वर्गाची सर्वाधिक कुचंबणा यामुळे होत आहे. सावलीसाठी प्रवासी निवारा असलेल्या भागात उभे राहतात. दूरवर लोकल दिसू लागली की मग लोकल पकडण्यासाठी प्रवासी इच्छित डब्याजवळ उभे राहतात. या धावपळीत धक्काबुक्के खात प्रवाशांना पळावे लागते.
श्वानांचा उपद्रव
डोंबिवली रेल्वे स्थानकात दररोज सकाळी मासळीच्या टोपल्या लोकलमधून उतरविल्या जातात. या टोपल्यांमधील मासळीचे तुकडे मासळी विक्रेते श्वानांंना खाण्यासाठी टाकतात. आयती मासळी खाण्यास मिळत असल्याने भटके श्वान फलाटावर भटकत असतात. या श्वानांमध्ये चढाओढ सुरू झाली की ती फलाटावर मनमानीने पळत सुटतात. त्याचा त्रास प्रवाशांना होतो. फलाटावरील पाणपोई गळकी झाल्याने या पाणपोईतील पाणी फलाटावर वाहत असते. त्यामुळे काही ठिकाणी निसरडा तयार झाला आहे.