अंबरनाथ: परिवहन सेवा नसलेल्या उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांना कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि राज्य परिवहन सेवेच्या बसचा काही अंशी फायदा होतो. मात्र या शहरांमध्ये बस थांबेच नसल्याने प्रवाशांना ऊन, पावसाचा सामना करत बसची प्रतीक्षा करावी लागते. कल्याण डोंबिवली महापालिका या शहरांसाठी अतिरिक्त बससेवा येत्या काळात सुरू करणार आहे. मात्र थांबेच नसतील तर प्रवाशांच्या त्रासात भर पडेल. त्यामुळे थांबे उभारून सेवा वाढवण्याची मागणी होते आहे.
अंबरनाथ, बदलापूर ही शहरे विकसीत होत असताना यात चाकरमानी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाले. विविध महापालिका, शासकीय कार्यालये, खासगी मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी या दोन्ही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. चाकरमानी वर्गाकडून प्रवासासाठी रेल्वे सेवेला प्राधान्य दिले जाते. मात्र बसने प्रवास करणारा आजही मोठा वर्ग आहे. बदलापूर, अंबरनाथ या शहरांना स्वतःची परिवहन व्यवस्था नसली तरी कल्याण डोंबिवली महापालिका, नवी मुंबई महापालिका यांच्या परिवहन सेवेच्या बस आणि राज्य परिवहनच्या बससेवा या शहरांमध्ये दिल्या जातात. बदलापूर पूर्व भागातून पनवेल, नवी मुंबई आणि वाशी या शहरात जाण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या बस सुटतात. तर पश्चिम भागातून राज्य परिवहनच्या बस बस स्थानकातून सोडल्या जातात.
हेही वाचा >>> Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
अंबरनाथ शहरात कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन विभागाची बस जांभूळपर्यंत जाते. त्याचा फायदा उल्हासनगर शहरालाही होतो. या भागातून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला प्रवासी आणि चाकरमानी यांच्यासाठी ही बससेवा फायदेशीर आहे. यांच्या फेऱ्या कमी असल्या तरी सकाळी आणि सायंकाळी असलेल्या या बस फेऱ्यांमुळे प्रवाशांची सोय होते.मात्र या प्रवाशांना ऊन, पावसाचा सामना करत या बसची वाट पहावी लागते आहे. या मार्गावर अवघे एक ते दोन सुस्थितीत असलेले बस थांबे आहेत. इतर सर्व थांबे कागदोपत्री आणि प्रवाशांना माहिती असलेले आहेत. त्या जागेवर प्रवासी बसची वाट पाहू शकतील असे काहीही नाही. बस थांब्याना कोणतेही छप्पर नाही. ना कोणतीही वास्तू या बस थांब्याची आहे. विना थांबा हा बसचा प्रवास प्रवाशांना त्रासदायक ठरतो आहे. सेवेसोबतच थांबेही बांधावे अशी मागणी प्रवासी करत आहेत.
बस थांबे बांधणार कोण
उल्हासनगर, अंबरनाथ किंवा बदलापूर या शहरांना बससेवेचा फायदा होत असला तरी या शहरांच्या स्वतःच्या परिवहन सेवा नाहीत. त्यामुळे या पालिकांनी अद्याप कोणतेही बस थांबे बांधले नाहीत. तर ज्या पालिकांच्या बस सेवा देतात त्या पालिकांच्या परवानगी शिवाय थांबे उभारू शकत नाहीत. परिणामी प्रवासी विना थांबाच प्रवास करत आहेत.
येथे होतो विनाथांबा प्रवास
बदलापूर नवी मुंबई मार्गावर कात्रप, घोरपडे चौक, कार्मेल शाळा, डीमार्ट, आनंदनगर, प्रीतम थांबा, नेवाळी, खोणी, तर बदलापूर कल्याण मार्गावर बदलापुरच्या वेशीपर्यंत सर्वच थांबे, फॉरेस्ट नाका, लादी नाका, विमको, शास्त्री चौक, अंबरनाथ नगरपालिका, मटका चौक ते थेट उल्हासनगरपर्यंत या कोणत्याही ठिकाणी थांबा नाही.