ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर दररोज मद्यपी, गर्दुल्ले जागोजागी बसले असल्याने त्यांच्यातून वाट काढून स्थानकात जाणे प्रवाशांना जिकरीचे होत आहे. रात्रीपासून ते दिवसभर गर्दुल्ले खाण्याचे साहित्य, दुर्गंधी येत असलेले कपडे जवळ घेऊन पादचारी पुलावर काही बसलेले, काही झोपलेले असतात. या गर्दुल्ल्यांवर रेल्वे सुरक्षा जवानांकडून कारवाई केली जात नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.
डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा जवान, गृहरक्षक दलाचे सारखे फिरत असतात. या स्थानकांवर मागतेकरी, गर्दुल्ले, मद्यपी यांना बसण्यासाठी आसरा मिळत नाही. एखादा भिकारी स्थानकात दिसला तरी रेल्वे सुरक्षा जवान त्याला रेल्वे स्थानका बाहेर काढतात. या सततच्या कारवाईमुळे गर्दुल्ले कमी वर्दळ असलेल्या कोपर, ठाकुर्ली रेल्वे स्थानकात जाऊन आपले बस्तान बसवितात.
हेही वाचा : कल्याण: लाइनमनच्या सतर्कतेमुळे टळला मध्य रेल्वेवरील अपघात
गेल्या काही दिवसांपासून ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर प्रवाशांच्या येण्याच्या जाण्याच्या मार्गात गर्दुल्ले बसलेले, काही अस्ताव्यस्त झोपलेले असतात. या मार्गिकेतून जाताना प्रवाशांना विशेष करुन महिलांना अडचणीचे होत आहे.ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे एक लाख प्रवासी प्रवास करतात. या स्थानकातील सरकता जिना अनेक वेळा बंद असतो.
त्यामुळे प्रवाशांना जिन्यावरुन जाऊन स्थानकात उतरावे लागते. जिन्यातून जाताना अलीकडे गर्दुल्ल्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. रात्रीच्या वेळेत उशिरा एखादा प्रवासी एकटाच असेल तर हे गर्दुल्ले गटाने त्या प्रवाशाच्या मागे लागून त्याला लुटण्याचा प्रयत्न करतात, असे प्रवाशांनी सांगितले. यासंदर्भात जागरुक प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा बळाच्या वरिष्ठांना कळविले आहे. त्यांनी या विषयी गंभीर दखल घेण्याचे आश्वासन दिले आहे.