ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी फलाट क्रमांक दोन लगत लोखंडी अडथळे उभारण्यात आलेले आहेत. परंतु या अडथळ्यांतील काही लोखंडी सळई कापण्यात आलेल्या असून तेथून प्रवासी रेल्वे रुळ ओलांडून प्रवास करीत असल्याचे चित्र आहे. पुलावरून प्रवासाचे श्रम टाळण्याबरोबरच वेळेत बचत करण्यासाठी प्रवाशांकडून असा जीवघेणा प्रवास सुरू आहे. या प्रवाशांवर रेल्वे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असली तरी कापलेल्या लोखंडी अडथळ्यांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांचा रेल्वे रुळ ओलांडून प्रवास सुरू असल्याचे दिसून येत आहे.
ठाणे रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेचे सर्वाधिक वर्दळीचे स्थानक आहे. येथून दररोज सहा ते सात लाख प्रवासी प्रवास करतात. स्थानकात प्रवासी सेवेसाठी एकूण चार पूल आहेत. सकाळी आणि सायंकाळच्यावेळी या पुलांवर नेहमी गर्दी होत असते. ही गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने दोन पादचारी पुलांच्या बांधणीचे काम सुरू आहे. परंतू, पुलांवर होणारी गर्दी, त्यात जाणारा वेळ आणि पुल चढण्यासाठी होणारे श्रम कमी करण्यासाठी काही प्रवासी रूळ ओलांडून प्रवास करतात. या प्रवाशांवर रेल्वे पोलिसांकडून कारवाई देखील करण्यात येत असते. मात्र काही दिवसांपासून ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चार वरून प्रवास करणारे प्रवासी रूळ ओलांडून फलाट क्रमांक दोनवर येतात. फलाट दोनवर कल्याण दिशेकडील शेवटास पुर्ण फलाटास लोखंडी अडथळे उभारण्यात आले आहेत. या अडथळ्यांतील काही लोखंडी सळई कापण्यात आलेल्या असून तेथून प्रवासी जीवघेणा प्रवास करीत आहेत. या सळईमधून वाट काढत प्रवासी सिडकोच्या दिशेने प्रवास करतात. ठाणे स्थानकातील फलाट दोनवर स्थानकाबाहेर जाण्यासाठी एकूण तीन प्रवेशद्वार आहेत. मात्र, अनेक प्रवासी स्थानकाबाहेर जाण्यासाठी या लोखंडी सळईमधून प्रवास करत असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा…ठरवले तर वरळीत येऊन पाडू… आदित्य ठाकरे यांना शिंदे यांच्या युवासेनेचा इशारा
ठाणे रेल्वे स्थानकात फलाट दोनवर कल्याण दिशेकडील शेवटास एक संरक्षक भिंत होती. ती भिंत पडक्या अवस्थेत होती. फलाट क्रमांक तीन, चार वरील प्रवासी रूळ ओलांडून या भिंतीच्या मार्गाने सिडकोच्या दिशेने प्रवास करायचे. या प्रवाशांवर रेल्वे पोलिसांकडून सतत कारवाई होत होती. तसेच या प्रकारास आळा बसावा यासाठी रेल्वे प्रशासनाने त्या ठिकाणी आडव्या, उभ्या लोखंडी पट्ट्यांचे अडथळे बसवले आहेत. मात्र, या लोखंडी सळई कापल्या असून येथून हे प्रवासी प्रवास करत असल्याचे दृश्य समोर आले आहे.
हेही वाचा…अपूर्ण होम प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनाचा घाट; बदलापुरात विरोधी पक्ष आक्रमक, उद्घाटनाला विरोध
ठाणे रेल्वे स्थानका बाहेर जाण्यासाठी असणाऱ्या अधिकृत प्रवेशद्वारांचा वापर प्रवाशांनी करावा. तसेच या प्रकरणातील कापण्यात आलेल्या लोखंडी सळईबाबत तपासणी करून आवश्यक ती कारवाई करू. – पी. डी. पाटिल , जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे