डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरील छतावरील पत्रे दुरुस्तीच्या कामासाठी काढण्यात आल्याने प्रवाशांना गेल्या काही दिवसांपासून उन्हात उभे राहावे लागते. पत्रे काढलेला भाग महिला डब्याच्या जवळ असल्याने महिला प्रवाशांना विशेष करुन उन्हाचा त्रास सहन करावा लागतो.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरील कल्याण बाजुकडे रेल्वेच्या ठेकेदाराने दुरुस्तीच्या कामासाठी छत्रे काढून टाकले आहेत. पत्रे काढल्यानंतर उर्वरित काम पूर्ण करून तात्काळ पत्रे बसविण्याचे काम करण्याऐवजी काम रखडून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे फलाटावर उभे राहणाऱ्या प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागते. दुपारच्या वेळेत प्रवाशांना लोकल येईपर्यंत सावलीचा आडोसा घेऊन उभे राहावे लागते. महिला डब्या जवळील भागात छतावरील पत्रे काढण्यात आले आहेत. पत्रे बसविण्याची कामे ठेकेदाराने तात्काळ पूर्ण करावीत, अशी प्रवाशांची मागणी आहे.
हेही वाचा- बदलापूरमधील रासायनिक कंपनीला आग; तीन जखमी
फलाटावरील स्कायवाॅकवरुन काही वेळा भिकारी, गर्दुल्ले, दारुडे एखादी वस्तू अचानक फलाटावर फेकून देतात. ती वस्तू प्रवाशाला लागते. दुपारच्या वेळेत शाळा सुटल्यानंतर दिवा, मुंब्रा भागातून डोंबिवलीत शाळेसाठी येणारी मुले उन्हात बसून लोकलची वाट पाहत बसतात. रेल्वे प्रवाशांची होणारी ही गैरसोय विचारात घेऊन रेल्वे ठेकेदाराने लवकरात लवकर ही कामे पूर्ण करावीत, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे.